मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काल संध्याकाळपासून सुरु असलेली पावसाची संततधार अजूनही सुरुच आहे. मुलुंड, भांडुप, पवई, कुर्ला, सायन, परेल, दादर,  भागात रात्रभर मुसळधार पाऊस बरसला, त्यामुळे सायन, दादर, हिंदमातासह अऩेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. दरम्यान,  गेल्या 24 तासांपासून राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवारी दिवसभर पडल्यानंतर पावसाने मध्यरात्रीनंतर जोर धरला.


मुंबईनजीकच्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईतही मुसळधारा बरसत आहेत. याचाच परिणाम थेट मुंबईच्या लोकलसेवेवर झालाय. मध्य रेल्वेची वाहतूक सध्या 10-15 मिनिटं उशिरानं सुरु आहे. दरम्यान, येत्या 48 तासांत मुंबईसह कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आज दिड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे. परंतु दुपारच्या सुमारास समुद्रात 4.57 मीटरच्या लाटा उसळणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांना गणपती विसर्जनासाठी समुद्रात न जाता कृत्रीम तलावाचा वापर करण्याचं अवाहन करण्यात आलं आहे.