मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर शासकीय कार्यालयांना मुभा देण्यात आली आहे.
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवर विविध ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने ठाणे ते मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी-अंधेरी-गोरेगाव, ठाणे-कसारा, ठाणे-कर्जत-कसारा, हार्बर रेल्वेवर वाशी-पनवेल, ट्रान्स हार्बर रेल्वेवर ठाणे-वाशी-पनवेल रेल्वे सेवा सुरु आहे.
ठाणे-सीएसएमटी, वाशी-सीएसएमटी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. तर ट्रान्स हार्बरवरील वाहतूक उशीराने सुरु आहे. पश्चिम रेल्वेची सेवा चर्चगेट ते वसई दरम्यान सुरु आहे. मात्र नालासोपारा दरम्यान पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर एसी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.