मुंबई : मुंबईतील मालाडमध्ये पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून 20 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या याठिकाणी बचाव कार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.


एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्यादरम्यान चार जणांना वाचवण्यात यश आलं आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर शताब्दी रुग्णालयात आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.









मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत


मालाड दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दु:ख व्यक्त केलं आहे. "मालाड दुर्घटनेबद्दल दु:खी आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो. तर जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो", असं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.





रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबई शहरासाठी देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.


VIDEO | मुंबई, नवी मुंबईतील महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, शासकीय कार्यालयांनाही मुभा