मुंबई : यंदा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला, अनेक स्टेशन्सवर प्लॅटफॉर्मच्या लेव्हलपर्यंत पाणी आलं, पण लोकल थांबल्या नाहीत, हे नालेसफाईच्या कामाचं यश आहे असं महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल म्हणाले. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. असं असलं तरी रस्तेमार्ग आणि लोकलसेवा धिम्या गतीने, मात्र सुरळीत सुरू आहेत.
मुंबई महापालिका आयुक्त म्हणाले की, "मुंबईत एकूण पावसाच्या 50 टक्के पाऊस होऊन गेला. आतापर्यंत 1000 मिमी पेक्षा जास्त पाऊस होऊन गेला आहे. हिंदमाता आणि सायनची समस्या भूमीगत टाक्यांच्या मदतीनं यंदा सोडवण्यात यश आलं आहे. यंदा मुसळधार पावसातही लोकल थांबल्या नाहीत, नालेसफाईच्या कामाचे हे यश आहे."
अलर्टच्या दिवशी आणि भरतीवेळी मुंबईकरांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास पूर्णत: बंदी असून नागरिकांनी महापालिकेच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केलं आहे. दरम्यान, 14 जुलैपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर पाऊसमान वाढलेले राहील, अशी शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे जिल्ह्यात 'ऑरेंज अॅलर्ट' कायम ठेवण्यात आला आहे.
मुंबई उपनगरात पाऊस सुरू, मात्र वाहतूक सुरळीत
मध्यरात्रीपासून मुंबईत रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईत सद्यस्थितीत कुठेही सखल भागात पाणी नाही. रिमझिम पाऊस असल्याने रस्ते वाहतूक ही धिमी सूरू आहे, मात्र सुरळीत आहे. तर मध्य व हार्बर मार्गावर लोकल 5 ते 6 मिनिटं उशीराने आहेत. तर पश्चिम मार्गावर गाड्या वेळेत आहेत. मुंबईत मंगळवारी दिवसभरात अधूनमधून विश्रांती घेत पाऊस सुरू होता. सांताक्रूझ येथे 24.2, तर कुलाबा येथे 18.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळच्या वेळेत अधिक पाऊस झाला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, शहर येथे काही ठिकाणी सकाळी 20 ते 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
14 जुलैपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर पाऊसमान वाढलेले राहील, अशी शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे जिल्ह्यात 'ऑरेंज अॅलर्ट' कायम ठेवण्यात आला आहे. पालघर, रायगड जिल्हा, तसेच नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात 'रेड अॅलर्ट' जारी करण्यात आला आहे.