Mumbai Rain Forecast Update : देशभरात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. देशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या वतीनं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही भागांत मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडीमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आयएमडीच्या मुंबई केंद्रानुसार, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 


पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये बुधवार आणि गुरुवारसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात शुक्रवारी हलक्या सरी कोसळू शकतात.  21 आणि 22 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला रेड अलर्ट, प्रामुख्याने पुणे, साताऱ्यातील घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई उपनगरांमध्ये देखील चांगल्या पावसाचा अंदाज, उद्यासाठी मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट तर 22 जुलै रोजी रेड अलर्ट, ज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता, नाशिक जिल्ह्यातही 22 जुलै रोजी सर्वत्र पावसाचा अंदाज देण्यात आला.  विदर्भात पुढील 3-4 दिवस सर्वत्र पाऊस, 21 आणि 22 तारखेला अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील पाऊस राहणार, काही ठिकाणी मुसळधार तर अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. 


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता 


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने 21 आणि 22 जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कोकणात पावसाचा जोर पुढील पाच दिवस कायम राहणार, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही पुढील 3-4 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने चांगल्या पावसाचा अंदाज देण्यात आले आहे. कोकण पट्ट्यावर आणि मध्य महाराष्ट्रावर ढगांची दाटी कायम, त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, पुणे आणि कोल्हापूरातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. 21 आणि 22 जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस अपेक्षित, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पावसाचा अंदाज व्यक्त करत आहे.