Rain Update News : सर्वांना प्रतिक्षा असलेला मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे. पुढच्या तीन ते चार दिवसात मान्सून राज्याच्या इतर भागात देखील सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. या पावसामुळं उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


दरम्यान, पुण्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं पोलिसांचीही तारांबळ उडाली. पावसात पुणे पोलीस आयुक्ताल्यासमोरील झाड कोसळल्याची घटना घडली. यामुळं आयुक्तालयात 20 हून अधिक वाहन अडकली होती. झाड हटवायला बराच वेळ लागला, त्यानंतर वाहनं आयुक्तालयातून बाहेर पडली. पुणे शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं विविध ठिकाणी सुमारे 30 झाडपडीच्या घटनांची अग्निशमाक दलाकडे नोंद झाली आहे. तसेच नाशिक शहरात वादळी वारा आणि ढगांच्या गडगडटासह मुसळधार पाऊस झाला


पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल


पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून रात्रीपासून ढगांच्या गडगडाटाह रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं वातावरणात असलेला उकाडा कमी झाला असून, गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळं उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून बळीराजाही सुखावला आहे.


75 ते 100 मीमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी : कृषी आयुक्त


शुक्रवारी (10 जून) नैऋत्य  मान्सून कोकणात दाखल झाला. भारतीय हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले होते. अखेर मान्सूनची प्रतिक्षा संपली असून नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मागच्या वर्षी मान्सून 7 जूनला तळकोकणात दाखल झाला होता. तर यावर्षी महाराष्ट्रात यायला मान्सूनला तीन दिवस उशीर झाला आहे. राज्यातील शेतकरी पावसाची वाट बघत होते. कारण खरीपाच्या हंगामासाठी शेतकरी जमिनीची मशागत करत आहेत. आता मान्सून कोकणात दाखल झाला आहे. पुढच्या तीन चार दिवसात मान्सून राज्यात अन्य भागात दाखल होईल, त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकरी खरीपाची पेरणी करतील. खरीप हंगाम 2022 मध्ये किमान 75 ते 100 मीमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केलं आहे. तसेच पेरणीसाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडे उपलब्ध असलेलं चांगलं सोयाबीनचं बियाणे वापरावं असेही ते म्हणालेत. 


महत्वाच्या बातम्या: