Mumbai Rain Update : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई (Mumbai) , ठाणे (Thane) , रायगड आणि घाट माथ्यावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain) बरसत आहे. मुंबईच्या काही भागांमध्ये रविवारी रात्री 40 ते 50 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत गेल्या चोवीस तासांमध्ये 44.6 मिमी पाऊस बरसल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिली आहे. रविवारी रात्रीपर्यंत 13.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. दरम्यान सोमवारी मुंबईतील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.






मुंबईला यलो अलर्ट


दरम्यान हवामान विभागाकडून मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.  मुंबईत पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मुंबई अंशतः ढगाळ वातावरण सुरु असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


पावसाचा लोकल सेवेवर परिणाम


मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावासामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे. कर्जतवरुन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली असून या मार्गावरील लोकल या 15 ते 20 मिनिटे उशाराने सुरु आहे. दरम्यान मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र सध्या आहे. डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर आणि अंबरनाथ या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. यामुळे कर्जत आणि कसाऱ्याहून येणाऱ्या नोकरदारांना त्रास होत असल्याचं सांगण्यात येत आहे. 


रायगमध्येही मुसळधार पावसाची हजेरी


रायगडमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावासाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच रायगडमधल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सोमवार (24 जुलै) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 


राज्यातील इतर जिल्ह्यांची स्थिती 


कोकणातील रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील बहुतांश जिह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे, तर काही भागात अतिवृष्टी झाली आहे. 


 हे ही वाचा : 


Buldhana Crop Loss : बुलढाण्यात तीन तालुक्यात अतिवृष्टी, एक लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका संग्रामपुरात