मुंबई : मुंबईत (Mumbai Rain)गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (heavy rain) सुरु आहे.  मुंबईत पाऊस सुरु झाला की एक ठिकाण मीडियामध्ये चर्चेत असतं. त्या ठिकाणाचं नाव म्हणजे हिंदमाता. मुंबईत अनेक ठिकाणी पावसाळ्यात नेहमी पाणी साचतं त्यापैकी हिंदमाताही एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदमाताला पाणी साचण्याची परंपरा कायम आहे. इतक्या वर्षांत मुंबई बदलली पण हिंदमाताचं पाणी साचण्याचं जंक्शन बदललं नाही. 

गेल्या दोन दशकांत मुंबईत 50 हून अधिक पुल बांधले गेले. मेट्रो आणि मोनोरेल चालू  झाल्या. वांद्रे-वरळी सी लिंक बनला. इस्टर्न फ्रीवे बनला. काही लोकल गाड्या वातानुकूलित झाल्या. सिंगल स्क्रीन सिनेमांची जागा मल्टिप्लेक्सने घेतली.  एकूणच मुंबईचे स्वरूप बर्‍याच प्रमाणात बदलले पण मुंबईतील ज्या जागेच चित्र बदलले नाही ते आहे हिंदमाता. गेल्या दोन दशकातील कोणत्याही वर्षाच्या पावसाळ्याची छायाचित्रे पाहा. या ठिकाणचे रस्ते नदीत बदललेले दिसतील आणि लोकांचा दर पावसाळ्याचा संघर्ष अजून ही सुरु आहे. 

मुंबईसाठी हिंदमाता जंक्शनचे महत्त्व आहे. कारण याच जंक्शनपासून दक्षिण व मध्य मुंबईला उपनगराला जोडणारा रस्ता जातो. हा रस्ता इस्टर्न एक्सप्रेस हायवे, मुंबई नाशिक हायवे आणि त्यानंतर मुंबई आग्रा हायवे बनतो. हिंदमाता जंक्शनवर पाणी भरणे म्हणजे या सर्व रस्त्यांवरच ट्राफिक ठप्प होणे.  या जंक्शनला हिंदमाता असे नाव देण्यात आले कारण तेथे हिंद माता मंदिर आहे. 1984 पर्यंत इथे हिंदमाता नावाचा सिनेमा हॉल असायचा जिथे मराठी चित्रपटांचं चित्रीकरण व्हायचं. जवळपास रहाणारे गिरणी कामगार येथे चित्रपट पहायला येत असत. येथे पाणी भरण्याचे मुख्य कारण म्हणजे हे परिसर शहराच्या सखल भागात येतो. परिसराचे भौगोलिक स्वरुप बशीसारखे आहे, त्यामुळे आजूबाजूचे पाणीही येथे साचते. येथून 5 किमी अंतरावर रे रोडवर बीएमसीचे सर्वात जवळचे पंपिंग स्टेशन आहे. मुंबई भौगोलिकदृष्ट्या कोकणचा एक भाग आहे आणि कोकण हा देशातील पर्जन्यमान क्षेत्रांपैकी एक आहे. हेच कारण आहे की बीएमसीचे सर्व प्रयत्न करूनही हिंदमातामध्ये पाणी भरले जाते

दरवर्षी पावसाळ्याच्या वेळी बीएमसीच्या तयारी बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जातात परंतु असे नाही की बीएमसीने हिंदमाताचा प्रश्न सोडविण्यासाठी काही केले नाही. वर्ष 2019 मध्ये, बीएमसीने येथे एक बोगदा तयार केला ज्याची खोली 6 मीटर आणि रुंदी 2.2 मीटर आहे. आता बीएमसीने परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन 130 कोटी खर्च करून येथे भूमिगत पाण्याची टाकी बनविली ज्याची लांबी 6  मीटर, 50 मीटर रुंदी आणि 6 मीटर खोल आहे. ही टाकी 30 लाख लिटर पाणी साठवू शकते.  

हिंदमातामध्ये पाणी भरल्याची छायाचित्रे आजही पूर्वीसारखीच आहेत, परंतु येथेही सकारात्मक बदलही झाले आहेत. 9 जून रोजी हिंदमातामध्ये पाणी साचल्यानंतरही या रस्त्यावरील वाहतूक थांबली नाही, कारण बीएमसीकडून हिंदमाता आणि परळ मधल्या रस्त्याची उंची वाढविण्यात आली होती. त्यामुळे पहिल्यांदा  वाहतुकीवर पावसाचा कोणताही परिणाम झाला नाही. आपल्या नैसर्गिक संरचनेमुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मुंबई जलमय होते. अश्या परिस्थितीत उशिरा का होईना यातून धडा घेत हिंदमातासाठी केलेले प्रयत्न जर शहरातील इतर भागातही केले गेले तर मुंबईकरांची वेदना थोडी कमी होऊ शकेल.