Devendra Fadnavis on Mumbai Rain: नांदेड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून यामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आता तेथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, मुंबईत अतिवृष्टीपेक्षाही मोठा पाऊस झाला आहे. काही भागांमध्ये 300 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस (Mumbai Rain) झाला आहे. हा विक्रमी पाऊस आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. काही ठिकाणी पाण्याचा निचरा होऊन वाहतूक सुरु झाली आहे. तर मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. मात्र, आता पाणी कमी होत असल्याने लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. ते मंगळवारी मुंबईतील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Continues below advertisement

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काही तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिले. मिठी नदी धोकादायक पातळीवर गेल्याने आपल्याला 400-500 लोकांना आपल्याला हलवावं लागले. मिठी नदीच्या पातळीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे. गेल्या काही तासांमध्ये मिठी नदीची पातळी कमी झाली आहे. मात्र, येत्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आपण सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी आणि वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळी समुद्राला भरती येणार आहे. तेव्हा पावसाची परिस्थिती काय असेल ते बघावे लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

आपण राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) आणि राज्य आपत्ती निवारण दलाला (SDRF) सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील बहुतांश नद्या इशारा पातळीवर आहेत. काही नद्या इशारा पातळीच्या वर आहेत. आपला बाजूच्या राज्यांसोबत योग्य संपर्क आहे. पाण्याच्या विसर्गाचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले जात आहे. आपल्याला फक्त हिपरगीची चिंता आहे, तिकडूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पण तो अधिक व्हावा, ही आपली मागणी आहे. तेलंगणासोबतही आपला संपर्क आहे. मात्र, काही कॅचमेंट क्षेत्रातील परिस्थिती आपल्या हातात नाही. त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Continues below advertisement

Mumbai Rain news: मुंबईतील काही भागात 300 मिमी पाऊस: देवेंद्र फडणवीस

मुंबईतील काही भागात 300 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. हा पाऊस अतिवृष्टीपेक्षाही जास्त आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या नावाखाली काय झालं, हे सगळ्यांना माहिती आहे. बंगालच्या उपसागराच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे,  तो आहे तोपर्यंत अतिवृष्टी संभावित आहे. त्यामुळे इकडे रेड अलर्ट दिला आहे, त्याप्रमाणे मोठा पाऊस पडतो आहे. काही अडचणी निर्माण होत आहेत. शहरांमध्ये आपलं डिझाईन हे नॉर्मल प्लस 10 अशी असते. पण अतिवृष्टी झाल्यावर अडथळे येतात. त्यामुळे आपण आता दर तीन तासांनी अलर्ट देत आहोत. कुठे आणि किती पाऊस पडणार, हे लोकांना सांगत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

राज्याच्या ग्रामीण भागात घरं आणि जनावारांच्या मृत्यूने जे नुकसान झाले आहे किंवा मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना आदेश आणि विशेष अधिकार दिले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी तातडीने मदत करु शकतात. शेतीच्या नुकसानीची मदत पंचनामे झाल्यावर केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

आणखी वाचा

मुंबईकरांनो, पुढचे तीन तास महत्त्वाचे; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुसळधार पावसाचा कहर, मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; ठाण्यात रेड अलर्ट, दोन दिवस सुट्टी जाहीर; घराबाहेर पडू नका आवाहन, शिंदेंही ऑन फिल्ड