मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईतील (mumbai rain update) नालेसफाईचा फज्जा उडाल्याचं चित्र असून अंधेरीसह इतर भागात कमरेपर्यंत पाणी साचल्याचं दिसून आलं. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी या संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.
देर आये दुरुस्त आये, या म्हणीप्रमाणे ओढ घेतलेल्या पावसाने शनिवारी मुंबईत जोरदार एन्ट्री केली आणि पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडवली. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साठलं होतं. पाण्याचा निचरा होत नसल्यानं मुंबईकरांना पाण्यातून वाट काढावी लागत होती. तर अनेक ठिकाणी गाड्या अडकल्या होत्या.
मुंबईतल्या पहिल्याच पावसाने नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल केलीय. अंधेरी भागात झालेल्या पावसाने पाणीच पाणी अशी स्थिती रस्त्यावर झाली होती. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की, लोकांना आधार देऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं लागत होतं. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या एका महिलेला अशाच प्रकारे सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. काही चार चाकी वाहनांच्या टायरच्या लेव्हलपर्यंत पाणी आलेलं पाहायला मिळालं.
Aditya Thackeray On BMC : काय म्हणाले अदित्य ठाकरे?
मुंबईतील नालेसफाईवरीन आदित्य ठाकरेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, मुंबईमध्ये काल अनेक ठिकाणी पाणी भरले. मुख्यमंत्री स्वतः नाल्यात उतरले, पण नालेसफाई झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत मुंबई मनपाने काळजी घ्यायला हवी होती. एका ठिकाणी इमारत कोसळली, लोकांच्या जीविताशी खेळ सुरू असून याची चौकशी झाली पाहिजे. गोवंडीत मॅनहोलमध्ये उतरलेले दोन कामगार गुदमरून मेले, त्याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. या ठिकाणी तंत्रज्ञानाचा उपयोग करायला पाहिजे. अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून काम करायला पाहिजे, अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. नगरसेवक नाहीत म्हणून मॉनिटरिंग करण्यास कोणी नाही. त्यामुळे प्रशासक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
दरम्यान आज मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर काही जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिकमध्येही ही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगडमध्ये पुढचे सलग चार दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.