Mumbai Weather Forecast : मुंबईमध्ये (Mumbai) सोमवारी रात्री अवकाळी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळाली. अरबी समुद्रामध्ये (Arebian Sea) कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबई पश्चिम उपनगरात रात्री पावसाला सुरूवात झाली, त्यासह ठाण्यातही मंगळवारी रात्री पाऊस झाला. मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत मुसळधार पाऊस झाला.


अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र


आयएमडीच्या (IMD) माहितीनुसार, मंगळवारी दुपारपासून मुंबईवर ढग होते. सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्र आणि गुजरातपर्यंत पसरलं असून त्यामुळे पाऊस पडत आहे. अंधेरी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे आणि बोरिवलीसह पश्चिम उपनगरातील अनेक भागातही मध्यम ते जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मुंबईतही थंडीला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) च्या मते, अरबी समुद्रात कमी दाबामुळे पाऊस पडला आहे. 


'या' भागात पावसाची शक्यता


महाराष्ट्रातही 'या' भागात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह रायगड, रत्नागिरी या कोकण जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो आणि बुधवारपासून तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. असामान्य हवामान चक्राचा अंदाज घेऊन, IMD ने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला होता.




हवामान अंदाज काय सांगतो?


पुढील 24 तासांत राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई अवकाळी पावसाने झोडपलं आहे. हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरातील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. मुंबईसह आज राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सातारा आणि जालना जिल्ह्यांसह विशेषत: मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.


आजही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र थंडी आणि कोरडे वातावरण असताना अनेक भागात पावसानं हजेरी लावली. आज हवामान खात्याने मंगळवारी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि जळगाव परिसरात पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या प्रदेशांवर पावसाचे ढग जमा झाल्याचं चित्र असून आजही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.