मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना गारव्याचा अनुभव आला असून मुंबई उपनगरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी (Mumbai Rain) बरसल्या. मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहा ते पंधरा मिनिटे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र धावपळ झाल्याचं दिसून आलं. त्याचसोबत ठाणे, कल्याण, भिवंडीसह राज्यातल्या अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याचं दिसून आलं.
Thane Rain : ठाण्यात पाऊस, चाकरमान्यांची धावपळ
ठाणे शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने ठाणेकरांची पार तारांबळ उडाल्याचं दिसून आलं. तसेच ठाण्यातील तुळजाभवानी मंदिर परिसरात झाड पडण्याची घटना घडली.
Bhiwandi Rain Update : भिवंडीत उकाड्याला ब्रेक
भिवंडी शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली असून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्याला मोठा ब्रेक लागला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे तापमानात घसरण होऊन परिसरात आल्हाददायक गारवा निर्माण झाला. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. वादळी वाऱ्यांमुळे शहर व ग्रामीण भागातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
Palghar Rain Update : पालघरमध्ये विजेच्या कडकडाटीसह वादळी पाऊस
रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने पालघर जिल्ह्यातील अनेक भागात हाहाकार माजवला. समुद्रकिनारी असलेल्या अनेक बोटी एकमेकांवर आदळून मोठ्या प्रमाणात मच्छीमारांचा नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील उन्हाळी भात शेती, त्याचप्रमाणे वीट भट्ट्या आणि अनेक घरांचे छप्पर उडून नुकसान झालं. मोठ्या प्रमाणात लग्नसराई सुरू असल्याने पावसामुळे लग्नासाठी उभारलेले मांडव वादळी वाऱ्याने उडून गेले आहेत.
वसई-विरारमध्ये जनजीवन विस्कळीत
वसई-विरार परिसरात मंगळवारी रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले. जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाच्या धारा अनेक ठिकाणी धुमाकूळ घालत असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
वसईतील विविध भागांमध्ये फुलझाडांच्या बागांचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं. जोरदार वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या तुटल्या, फुलांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी बागेतील संरचना देखील कोसळली.
दरम्यान, विरारमधील एका हळदी समारंभाच्या कार्यक्रमाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. समारंभासाठी केलेली मंडपांची मांडणी पावसाच्या धारांनी उद्ध्वस्त झाल. विद्युत उपकरणे आणि सजावटीचे साहित्य देखील भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.
पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. हवामान खात्याने आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे.