Mumbai Rain: मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशीच एक गंभीर दुर्दैवी दुर्घटना गुरुवारी दुपारी सांताक्रूझ (पश्चिम) येथील रिलिफ रोडवर घडली. येथे एका खासगी पुनर्विकास प्रकल्पाच्या जागेवर झाड कोसळून आठ मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

Continues below advertisement

Mumbai Rain: पाहणी सुरू असतानाच कोसळले दुसरे झाड

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सांताक्रूझ येथील संबंधित खासगी प्रकल्पाच्या आवारातील एक झाड यापूर्वीच कोसळले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नगरसेविका हेतल गाला यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेचे पथक घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आले होते. हे पथक पहिल्या घटनेचा आढावा घेत असतानाच, अचानक परिसरातील दुसरे एक मोठे झाड उन्मळून पडले. या झाडाच्या ढिगाऱ्याखाली तिथेच काम करत असलेले आठ मजूर अडकले आणि जखमी झाले.

Mumbai Rain: जखमींना नानावटी रुग्णालयात दाखल केले

दुर्घटना घडताच घटनास्थळावर एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि पालिकेच्या आपत्कालीन पथकाने तातडीने बचावकार्य सुरू करून जखमी मजुरांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यांना तातडीने जवळच्या नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नूर आलम (26), राजेश कुडल (51), विनय कदम (38), सुलेमान शेख (28), विनोद भट (46), देवाश साह (28), जगदीश निकम (28) आणि निलाद तुळ्हे (67) अशी  जखमी झालेल्यांची नावे आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व आठही जणांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Continues below advertisement

Rain Update: नालासोपारा-वसईत रस्ते पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत

मुंबईसोबतच उपनगरे आणि ठाणे, पालघर जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. नालासोपारा आणि वसई-विरार परिसरात सकाळपासूनच पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांना, कामावर जाणाऱ्या चाकरमान्याना आणि शालेय विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून किंवा फुटपाथवरून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. स्टेशन जवळील आत्मवल्लभ सोसायटी परिसरातील संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे. या ठिकाणी 'अलायन्स रुग्णालय' असल्याने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयात जाण्यासाठी साचलेल्या पाण्यातूनच कसरत करावी लागत आहे.

IMD Alert: पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आजही दिवसभर मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पावसाचा हा जोर असाच कायम राहिल्यास सखल भागातील पाणी आणखी वाढून नागरिकांच्या अडचणीत मोठी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेने नागरिकांना आवश्यकतेशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Mumbai Rain Updates: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स