मुंबई : मुंबईसह राज्यात शनिवारी मुसळधार पाऊस बरसला. आज देखील मुंबईत आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


राज्यात विविध ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना पाहायला मिळाल्या. आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळपासून पावसाचा जोर कमी आहे, मात्र तो वाढण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.


हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मुंबई महापालिकाही सज्ज झाली आहे. मुंबई महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. डिजास्टर मॅनेजमेंट सह इतर यंत्रणांना अलर्ट केल्याचं बीएमसीने स्पष्ट केलं आहे.


मुंबईशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे. गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पुढील 2 दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.



महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 1050 प्रवाशांची सुटका


पुराच्या पाण्यामुळे वांगणीमध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या सुमारे 1 हजार 50 प्रवाशांची सुटका करण्यात आली. एनडीआरएफच्या मदतीने बोटीतून या प्रवाशांना सुखरुप रेल्वेतून बाहेर काढण्यात आले. शुक्रवारी रात्रीपासून हे प्रवासी पुराच्या पाण्यात अडकले होते. शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली.