मुंबई: मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पहिल्याच पावसात लोकलचा खोळंबा झाला असून ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्ग ठप्प झाला आहे. तसेच घाटकोपर स्थानकातही काही वेळेसाठी लोकल ठप्प झाल्याचं चित्र आहे.
वाशी आणि सानपाडा स्टेशन दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने संध्याकाळी 7.15 पासून ठाणे वाशी मार्ग बंद आहे. मात्र ठाणे पनवेल, ठाणे नेरूळ, मार्ग सुरू आहे. ज्यांना वाशीला जायचे आहे त्यांना जुई नगरला उतरून जावे लागणार आहे. तर मध्य रेल्वे मार्गावर देखील घाटकोपर स्थानकात ठाणे लोकल ठप्प झाली आहे. पाऊस सुरू असल्याने ओव्हर हेड वायर आणि पेंटाग्राफ मध्ये होत आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाच्या सरी
कल्याण डोंबिवलीकरांना असलेली पावसाची प्रतीक्षा आज अखेर संपली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसरात पावसने हजेरी लावली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने घरी परतणाऱ्या, खरेदीनिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आली. पावसाला सुरूवात होताच दुकानदारानी देखील छत्री, रेनकोट दुकानाबाहेर विक्रीसाठी काढल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना या पावसामुळे मात्र दिलासा मिळाला. पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता.
अंबरनाथ शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस
अंबरनाथ शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होतं आणि त्यामुळे पाऊस पडणार असं वाटत असताना आज सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. हा पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह पडत होता. पावसामुळे शहरात वीज गायब झाली होती, त्यामुळे सर्वत्र अंधार पसरला होता.
नाशिकमध्ये पाऊस सुरू
नाशिक शहरासह ग्रामीण भागात आज सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. चांदवड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. नाशिक शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. मात्र त्यानंतर 6 वाजेपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना यामुळे थोडा का होईना पण दिलासा मिळाला.