Mumbai Rains Live Update : बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाचा महाराष्ट्रातही प्रभाव दिसणार; विदर्भात 12-13 जून रोजी पावसाचा अंदाज, मुंबईतही पाऊस वाढणार
Maharashtra Mumbai Rain live updates : हवामान विभागानं मुंबई आणि लगतची उपनगरं ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने ओदिशा आणि आंध्रातील किनारपट्टी भागात येत्या 24 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातही याचा प्रभाव दिसणार असून 12 आणि 13 जून रोजी काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत देखील संध्याकाळनंतर पाऊस वाढणार आहे. सध्या मुंबईत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
मुंबईत मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं अखेर विश्रांती घेतली आहे. मध्यरात्रीपासूनच मुंबईसह लगतच्या काही उपनगरांतही पावसाच्या सरी कोसळत होत्या. मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पाणी साचण्यासही सुरुवात झाली होती. परंतु, पावसानं घेतलेल्या विश्रांतीमुळे अखेर काही भागांत साचलेलं पाणी ओसरलं आहे.
पुढील तीन तास मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तर संध्याकाळपर्यंत मध्यम स्वरुपाचाच पाऊस असण्याची शक्यता अधिक आहे. मात्र मुंबईत संध्याकाळपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.
मुंबईसह उपगनगरात पावसाने हजेरी लावली आहे. दिलासादायक बाब म्हणजे लोकल सेवा सुरळीत आहे. हार्बर, टान्सहार्बर आणि पश्चिम मार्गावरील लोकल वाहतूक सुरु आहे.
मुंबईतील सायन परिसरातील गांधी मार्केटमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हा सखल भाग असल्याने थोड्या पावसातही इथे पाणी साचलं. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसातही हा परिसर जलमय झाला होता. परिणामी वाहनांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तशीच परिस्थिती आजही निर्माण झाली आहे.
मुंबई शहरात सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. लालबाग, परळ, भायखळा, माझगाव दादर परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
वसई विरार क्षेत्रात रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र ढगाळ वातावरण कायम आहे. सलग दोन दिवसापासून वसई विरार नालासोपारा क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरु होती.
मुंबईसह पश्चिम उपनगरात पहाटेपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे, मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे तिथे दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांसाठी आणि नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
पुढील काही तासात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातही पावसाची हजेरी. लातूर, बीड, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता. पश्चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यवतमाळ : महागाव तालुक्यात जोरदार पाऊस गुंज बस स्थानकाजवळील पूल पाण्याखाली गेला. पुसद -महागाव- माहूर या तीन मार्गांचा संपर्क तुटला. त्यामुळे वाहनांच्या रांगा. बस स्थानक परिसरामध्ये पुलाचे बांधकाम 2 महिन्यांपासून सुरू होते. पुलाच्या दोन्ही बाजूने मातीचे बांध टाकले होते. मात्र आज आलेल्या जोरदार पावसाने याच पुलाच्या जवळील बांधवरील माती वाहून गेली. त्यामुळे मुसळधार पावसाने गुंज गावातील मुख्य वाहतूकीचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा याठिकाणी लागल्या आहेत.
वाशिम : वाशिम मंगरूळपीर शहरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने शहरातील रस्त्याचं पाणी शहरातील काही खालच्या भागातील दुकानात पाणी शिरलं होत त्या मुळे व्यापाऱ्यांची मोठी तारंबल उडाली तर काही दुकान नुकसान ही झालं
आजच्या कॅबिनेटमधे अनाथांना 1% आरक्षण देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता ,
अनाथ मुलांच्या व्याख्येत सरकार बदल करण्याची शक्यता,
अनाथांना शैक्षणिक शुल्कात सवलत मिळणार,
अनाथ आरक्षणातून प्रवेश घेणा-या मुलांचं शैक्षणिक शुल्क सरकार भरणार,
2018 मधे फडणवीस सरकारने आरक्षण देण्यात आले मात्र ते खुल्या प्रवर्गातून होते
अनेक मुल आरक्षणापासून वंचित होते, लाभ घेऊ शकत नव्हते
त्यामुळे आधीच्या निर्णय रद्द होत महत्वपूर्ण निर्णय आज होण्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु असून आज सकाळी सुद्धा पाऊस सुरु आहे. सुदैवाने या पावसाने कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आज हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे त्यामुळे पावसाचा जोर आज दिवसभर कायम असण्याची शक्यता असून समुद्र किनारपट्टीवरील भागांना हायअलर्ट करण्यात आले आहे. कालच अडीच हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. समुद्राला मोठे उधाण असून दाभोळ खाडी अंजर्ले खाडी बाणकोट खाडी या खाड्या सुद्धा दुथडी भरुन वाहत आहेत.
कोकणात हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पाजपंढती या गावातील सुमारे एक हजार लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. एका बाजूला समुद्र तर एका बाजूला डोंगर अशा दुहेरी संकटात हे गाव सापडले आहे, त्यामुळे या गावातील कुटुंबियाच्या जीविताला समुद्राचं उधाणा आणि दरड यामुळे धोका निर्माण झाला आहे. अशा धोकादायक वस्तीसाठी पुढील दोन दिवस धोकादायक असल्याने स्थलांतरित होण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापू, खेड, चिपळूण या तीन नगरपंचायतींपैकी चिपळूण नगरपंचायत क्षेत्रातील गावांना देखील अतिमुसळधार पावसाचा संभाव्य धोका असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. वाशिष्ठी नदीमुळे चिपळूण शहर आणि लगतची गावे यात बाधित म्हणून घोषित केली आहेत.
कोकण किनारपट्टी भागाला अलर्ट जारी केल्यानंतर आता कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. समुद्र आणि खाडी किनारच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गरज पडल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जाणार आहे. सद्यस्थितीत पालघरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या जोरदार आणि मध्यम स्वरुपाच्या सरी बसरत आहेत. सारी परिस्थिती आणि अलर्ट पाहता एनडीआरएफच्या 12 टीम्स या कोकणातील चार जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.
पहिल्याच पावसात खोळंबलेली मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केलं आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुबईला चांगलंच झोडपलं. मुंबईसह उपनगरांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. पावसाच्या कोसळधारांमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं, तसेच अनेक ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली होती. अशातच हवामान विभागानं मुंबई आणि लगतची उपनगरं ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेनं केलेल्या ट्वीटनुसार, "भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 'रेड अलर्ट' जाहीर केला आहे. तसेच, पुढील चार दिवसांसाठी मुंबईत 'ऑरेंज अलर्ट' घोषित करण्यात आला आहे. नागरिकांनी कृपया सतर्क राहावे व स्वतःची काळजी घ्यावी अशी विनंती"
मान्सूनच्या पहिल्याच सरींनी लोकल सेवा ठप्प
बुधवारी (9 जून) पडलेल्या पहिल्याच मान्सून सरींमुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. दिवसभर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली मीरा-भाईंदर अशा शहरांमध्ये मुसळधार पाऊस बरसत होता. साहजिकच याचा परिणाम हा सर्वप्रथम मुंबईच्या लाईफलाईनवर म्हणजेच मुंबई लोकलवर बघायला मिळाला. सतत पडलेल्या पावसामुळे ट्रॅकवरील पाणी धोक्याच्या पातळीच्या वर गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक दिवसभर स्थगित ठेवण्यात आली होती. सोबत हार्बर मार्गावरील वाहतूक देखील स्थगित होती. मात्र, मुसळधार पाऊस पडूनही पश्चिम रेल्वेवरील वाहतूक स्थगित झाली नाही.
बुधवारी पहाटे 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईतील पूर्व उपनगरात सर्वाधिक 214.44 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ पश्चिम उपनगरात 190.78 मिमी आणि शहर भागात 137.82 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पूर्व उपनगरात विक्रोळी येथे सर्वात जास्त 285.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाची तुफान बॅटिंग, जनजीवन विस्कळीत
चेंबूर 280.52 मिमी, मानखुर्द, गोवंडी - 248.52 मिमी, घाटकोपर - 21022 मिमी तर कुर्ला परिसरात 231.45 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरात मरोळ येथे सर्वात जास्त म्हणजे 272 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर अंधेरी (पूर्व) 271.76 मिमी, मालवणी 253.88 मिमी, गोरेगाव 217.36 मिमी, अंधेरी ( प.) 215.03 मिमी, दहिसर 208.22 मिमी, सांताक्रूझ 207.64 मिमी, वर्सोवा 207.44 मिमी, वांद्रे 86.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -