Mumbai Rain IMD Alert : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील काही तासांत मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. मुंबईत पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह राज्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईसह उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आता हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार तास मुंबईकरांसाठी धोक्याचे असल्याचं समोर येत आहे. पुढील काही तासांत आणखी जोरदार पाऊस कोसळणार आहे. 


मुंबईत पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पाऊस


हवामान खात्याने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचा इशारा दिला आहे. धोक्याच्या ठिकाणी जाणं टाळा आणि सुरक्षित स्थळी पोहोचा, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. हवामान खात्याचा इशारा पाहता खबरदारी घेत मुंबईतील काही ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडण्यात आलं आहे. पुढील तीन ते चार दिवस मुंबई आणि राज्यासह देशभरातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


गेल्या एक तासात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस


दरम्यान, हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या एक तासात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे. हा पाऊस सामान्यपेक्षा जास्त असल्याचे दिसून आलं आहे. मुंबईसह उत्तर कोकणात कमी ते मध्यम ढग दर्शवतात, त्यामुळे पाऊस काही काळ वाढू शकतो.






नागरिकांना खबरदारी बाळगण्याचा इशारा






मुंबईत ठिकठिकाणी साचलं पाणी


मुंबईसह पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाकडून, मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पावसाने मुंबईत जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची 'तुंबई' झाली आहे. हवामान खात्याने ठाणे, रायगड, पुणे आणि पालघर या चार जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.


मुंबईतील पावसाचा लोकल सेवेलाही फटका


मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या 'लाईफलाइन'ला बसला आहे. पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ला स्टेशन परिसरात पाणी साचलं आहे. याचा फटका मुंबई लोकलला बसला आहे. कुर्ला स्टेशन परिसरात पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. हार्बर लाइन वडाळा ते मानखुर्द लोकल वाहतूक बंद करण्यात आली आहे. डाऊन हार्बर सीएसटी ते वडाळा लोकल सुरू आहे. तसेच, डाऊन हार्बर मानखुर्द ते पनवेल लोकल सेवा सुरू आहे. दरम्यान, पावसामुळे मध्य रेल्वेवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ट्रेन  15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहेत.