तारांबळ टाळा, गरज असेल तरच आज घराबाहेर पडा!
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2017 09:19 PM (IST)
हवामान खात्याने येत्या 48 तासात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे मुंबईकरांनी खबरदारीचे उपाय घेण्याची गरज आहे.
मुंबई : मुंबईला यंदाच्या सर्वात मोठ्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. पुढच्या दोन दिवस आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली. येत्या काळात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे मुंबईकरांनी खबरदारीचे उपाय घेण्याची गरज आहे. ऑफिसला जाण्यासाठी मुंबईकर मंगळवारी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले, मात्र संध्याकाळच्या वेळेला घरी जाण्यासाठी प्रचंड हाल झाले. लोकल वाहतूक दिवसभर बंद होती, रस्ते वाहतूकही पाणी साचल्यामुळे कोलमडली. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी संधीचा फायदा घेत प्रवाशांची लूटमार केली. गुडघाभर, तर काही ठिकाणी छातीपर्यंत पाण्यातून वाट काढत मुंबईकर घरचा रस्ता जवळ करत होते. आज तारांबळ टाळण्यासाठी काय कराल? पावसाचा जोर कमी झाल्यामुळे आज सकाळी रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत असू शकते. मात्र पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान खात्यान दिला आहे. त्यामुळे दिवसभरात पावसाचा जोर वाढल्यानंतर काल जी परिस्थिती झाली, तीच पुन्हा होऊ शकते. लोकल वाहतूक कोलमडल्यानंतर ऑफिसहून घरी जाण्यासाठी अडचणी येतील. त्यामुळे गरज असेल, तर ऑफिसला जावं. मुंबईतील शाळांना सुट्टी हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण टळणार आहे. मात्र तरीही अनेक विद्यार्थी क्लासेससाठी घराबाहेर पडतात, अशा वेळी पालकांनी विद्यार्थ्यांना क्लासेसला पाठवणं टाळण्याची गरज आहे. संबंधित बातम्या :