Mega Block : रविवारी म्हणजे 15 मे रोजी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. देखभालीच्या आणि काही तांत्रिक कामांसाठी 15 मे रोजी रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक (Mumbai railway mega block) घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने ट्विट करून या मेगा ब्लॉकबाबतची माहिती दिली आहे. 


मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत वाहतूक किमान 15 मिनिटे उशिराने असणार आहे. पर्याय म्हणून धीम्या मार्गाची सर्व वाहतुक जलदगतीच्या मार्गावर वळवण्यात आली आहे.


छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस मुंबई येथून सकाळी 10 . 14 ते दुपारी 3.32 या वेळेत सुटणाऱ्या उपनगरीय धीम्या गाड्या माटूंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलग मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या, शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड स्थानकावर थांबतील. त्यानंतर मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने आपल्या निश्चित थांब्यावर पोहोचतील. 






ठाणे येथून सकाळी 10. 58 ते दुपारी 3. 59 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील उपनगरीय गाड्या मुलुंड स्थानकापासून अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबून पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील व नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा आपल्या निश्चित स्थानकांवर पोहोचलीत. 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.54 या वेळेत पनवेल/ बेलापूर/ वाशीसाठी सुटणाऱ्या गाड्या हार्बर मार्गावरील आणि पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून सकाळी 10. 16 ते दुपारी 3.47 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या उप हार्बर मार्गावरील गाड्या बंद राहतील. 


मेगा ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला,  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल, वाशी पनवेल या विभागादरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. शिवाय ब्लॉक कालवधीत हार्वर मार्गावरील प्रवाशांना ठाणे, वाशी/ नेरूळ स्थानकांतून सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.  


रविवारी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान 10.34 ते 3.35  वेळेत जलद मार्गांवर जंबो ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील.