Mumbai Train Accident: मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना (Mumbai Local Accident) घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 13 जण रेल्वेमधून पडले. कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते. त्याचवेळी सीएसएमटीवरुन निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली. यावेळी 13 प्रवासी खाली पडले आणि 4 प्रवाशांचा मृत्यू झाला.

ठाण्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी एबीपी माझाला माहिती दिली. दरम्यान जखमींवर कळवा आणि मुंब्र्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 10 जखमींपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती कळवा रुग्णालयाने दिली. तर कळव्यातील काही जखमींना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सदर अपघात झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती. मात्र पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली. 

मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी सगळी घटना सांगितली-

लोकलमधून प्रवासी फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. एका ट्रॅकवरुन सीएसएमटीकडे लोकल जात होती. तर दुसऱ्या ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने लोकल जात होती. यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली. सकाळी 9.30 वाजता ही दुर्घटना घडली आणि 9.50 पर्यंत ॲम्युबलन्स दाखल झाल्या आहेत आणि रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेली आहे, अशी माहिती स्वप्नील निला यांनी दिली. मुंब्रा आणि दिवा दरम्यान ही घटना घडली. अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान प्रवासी फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. अशात त्यांची टक्कर झाली किंवा बॅग लागला आणि धक्का लागला त्यामुळे ही 8 लोकं खाली पडलीत. रेल्वेने उपाययोजना करण्यासंदर्भातच नव्या लाईनचे नियोजन केले आहेत.  ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहोत.  कार्यालयांना देखील विनंती केली होती की कार्यालयातील वेळेमध्ये केले तर चांगलं होईल. लोकांचा देखील सहयोग गरजेचा आहे,  उपाययोजना आपण करत आहोत. पश्चिम आणि मध्यमध्ये अनेक गोष्टी वेगळ्या आहेत. मध्य रेल्वेची फ्रिक्वेन्सी अधिक आहेत, ब्रिज आणि टनेल अधिक आहेत.

मध्य रेल्वेवर अपघात नेमका कसा झाला?

- अपघात लोकल रेल्वेवरचा आहे, एक्स्प्रेसमधील नाही- दोन लोकल ट्रेन आजूबाजूने जात असताना ही घटना घडली - दिवा ते मुंब्रा दरम्यान ही दुर्घटना घडली- एक लोकल कसाराकडून सीएसटीकडे जात होती तर दुसरी लोकल सीएसटीकडून कल्याणकडे जात होती - सकाळी साडे नऊ वाजता दरम्यानची घटना - दोन्ही लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी पडले - दोन्ही लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला - बॅगांची गुंतागुंत झाली आणि ही घटना घडल्याची शक्यता - पुष्पक एक्सप्रेसचा या घटनेशी कोणताही संबंध नाही - ⁠एकूण 13 जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.

जखमी व्यक्तीची माहिती खालील प्रमाणे:

1) श्री. शिवा गवळी (पुरुष २३ वर्ष/यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)2) आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आढगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)3) रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)4) अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)5) तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व  त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)6) मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)7) मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)8) स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)9) प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती खालील प्रमाणे:

1 ) राहुल संतोष गुप्ता (28 ) रा. दिवा, 2) सरोज केतन (23 ) रा. उल्हासनगर 3) मयूर शाह (44 )4) मच्छीद्र मधुकर गोतरणे, वय-31 (पोलीस कॉन्स्टेबल)

Central Railway: अपघातानंतर मध्य रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय 

1. नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर असेल.

2. सध्याच्या लोकल ट्रेन्सनाही ऑटोमेटिक डोअर लावण्यासंदर्भात विचार केला जाईल.

3. कल्याण कसारापर्यंत तिसरी आणि चौथी  लाईन तर कुर्लापर्यंत पाचवी आणि सहावी लाईन नियोजित

4. ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार 

5. सरकारी आणि खासगी कार्यालयांनी एकच ऑफिस टाईम न ठेवता वेगवेगळे इन-आऊट टाईम ठेवावे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली-

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले?

मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी आहे. या देशात माणसांची किंमत नाही. मुंबईतील रेल्वे कशी चालते हेच जगाला आश्चर्य आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. तर, मुंबईत नीट रस्ते नाहीत, पार्कींग व्यवस्था नाही. केवळ रेल्वेपुरता हा विषय नसून शहरांचा विचका झाला आहे, अशा शब्दात राज यांनी रेल्वे अपघातावर आपले मत मांडले. मुंबईसह मेट्रो शहरात उंच इमारती उभ्या राहत आहेत, रस्ते नाहीत, लोकं वाढल्याने पार्किंगची व्यवस्था नाही. आग लागली तर बंब जायला वेळ नाही, बाहेरून येणारे लोंढे आहेत. कोण येतंय, कोण जातंय हे कळत नाही. मुंबईत मोनोरेल, मेट्रो आहे. कोण काय वापरताय हे कोणी बघत नाही. शहर म्हणून कोणी बघायला नाही. त्यामुळे, केंद्र सरकारने रेल्वेच्या स्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. 

जितेंद्र आव्हाडचे दावे काय? 

1) ऑटोमेटिक दरवाजे नियमित लोकल ट्रेन्सना शक्य नाही, लोक गुदमरतील, श्वास घेता येणार नाही 2)  दिवा, मुंब्रा, कळव्याची लोकसंख्या प्रचंड वाढली, त्या तुलनेत रेल्वे आणि रेल्वे फेऱ्या वाढल्या का वाढल्या नाहीत?3) एसी लोकलमुळे साध्या लोकल फेऱ्यांवर परिणाम, मरणारे हे सर्वाधिक नियमित लोकलमधले आहेत4) दिवा लोकल टर्मिनेट का नाही? पहिली दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरु करा5) पारसिक बोगद्यात तीन पोल अतिशय चिकटून, त्याला चिकटून हजार लोक मेले असतील पण तो पोल हटवला जात नाही.

सदर घटनेवर शरद पवार काय म्हणाले?

1) मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.2) मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. 3) लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही. 4) केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. 5) वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.

दिनेश पैठणकर, निवासी नायब तहसीलदार, ठाणे

या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमची सर्व स्टाफ तातडीने घटनास्थळी दाखल झाले आतापर्यंत जखमींचा आकडा 13 आहे. तर 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. मृत आणि जखमी यांचे नातेवाईक त्यांच्याशी संपर्क  करण्याचा आम्ही प्रयत्न करत  असल्याची प्रतिक्रिया तहसीलदार यांनी दिली.  

शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के काय म्हणाले?

सदर घटना अत्यंत दुर्देवी आहे. प्रशासनाने या अपघातामागील कारण शोधलं पाहिजे, असं शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. सदर घटना गर्दीमुळे झाल्याचं दिसून येतंय. प्रवाशांना कोणी धक्का दिला का?, याबाबत माहिती मिळणं गरजेचं आहे, असं नरेश म्हस्के यांनी सांगितले. 

माजी खासदार राजन विचारे काय म्हणाले?

मुंबई ते कल्याण या मार्गावरील लोकल आता कमी पडत आहे. लोकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. मोठ्या प्रमाणात लोकलमध्ये गर्दी असते. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी केली.  

विद्या चव्हाण संतापल्या, अपघातावर काय म्हणाल्या?

सदर अपघातासाठी रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. अपघात झाला तेव्हा रेल्वे स्थानकाबाहेर कोणतीही रुग्णवाहिका नव्हती. मुंबई लोकलची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. प्रवाशांना अद्याप चांगली सुविधा मिळत नाहीय. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते, लोक दरवाजाबाहेर उभे राहून प्रवास करतात. रेल्वेला उशीरा होतो, तेव्हा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते. यावेळी अनेकजण जीव धोक्यात घालून प्रवाशी लोकलमध्ये चढतात, असं माजी आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या.

गतीने आपण वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही- किरीट सोमय्या

मुंब्रा कळवा येथील घटना दुर्दैवी आहे. ठाणे ते डोंबिवली परिसरातील लोकसंख्या ज्या गतीने वाढली त्या गतीने आपण वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही. म्हणूनच देवेंद्र फडणवीस सरकारने मेट्रोच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पर्यायी रस्त्यांची क्षमता वाढवणे  आणि त्याच बरोबर ठाणे बायपास करून दिवाला डायरेक्ट रेल्वे कनेक्शन, सगळे डब्बे 15 डब्याचे करून, क्षमता वाढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला 2-5 वर्ष लागणार. अशा वेळेला प्रवाश्यांनी ही शिस्त पाळावी एवढीच विनंती, असं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले. 

मनसेचे नेते अविनाश जाधव काय म्हणाले?

सदर घटनेवर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या घटनेला संपूर्ण रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करायला हवं, अशी मागणी केली आहे.

संबंधित बातमी:

Mumbai Local Accident: रेल्वेच्या 'ब्लॅक स्पॉट'पैकी एक; ट्रेनचा वेग, मोठं वळण, अपघात झाला, ते ठिकाण नेमकं कसंय?, VIDEO