मुंबई : मुंबई आणि पुणे शहरात कोरोनानं कहर केला होता. मात्र आता या दोन महत्वाच्या शहरांमधील कोरोना नियंत्रणात आला आहे. मुंबईत मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1,021 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6 लाख 56 हजार 446 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 348 दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या 27,943 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत रिकव्हरी रेट वाढला असला तरी कालपेक्षा आज दैनंदिन रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. काल 1,037 रुग्णांचे निदान झाले होते तर 1417 रुग्ण बरे होऊन घरी गेले होतं. तर आज 1362 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज नवीन रुग्णांच्या तुलनेत डिस्चार्जही कमी झाल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे. मुंबईमधील धारावीत आज 3, दादरमध्ये 15, माहिममध्ये 19 नवीन रुग्ण आढळले आहेत.
मुंबईतील लसीकरणासंदर्भात महत्वाचं
मुंबई महापालिकेकडून सांगितलं आहे की, उद्याच्या लसीकरणाची नोंदणी आज http://cowin.gov.in वर करणे अनिवार्य आहे. आज संध्याकाळी 6 वाजेनंतर संबंधित विभाग लसीकरणाची माहिती जाहीर करतील. उद्या वॉक-इन सुविधा उपलब्ध नाही. दुसरा डोस घेण्यासाठी, कृपया पहिल्या डोससाठी वापरलेला संपर्क क्रमांक वापरा, असं पालिकेकडून सांगितलं आहे.
पुणे शहरात आज 683 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुणे शहरात आज नव्याने 683 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 67 हजार 541 इतकी झाली आहे. शहरातील 1 हजार 158 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 51 हजार 70 झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 8 हजार 356 रुग्णांपैकी 1020 रुग्ण गंभीर तर 2124 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात 8 हजार 751 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 24 लाख 60 हजार 516 इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 37 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 115 इतकी झाली आहे.