Mumbai: मुंबईतील दिवसेंदिवस वाढत्या पार्किंगच्या समस्येवर कायस्वरुपी तोडगा म्हणून सर्व पुलांच्या खाली आवश्यक त्या सुरक्षा नियमांचं पालन करून वाहनतळांची सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली होती. हायकोर्टानं याची गंभीर दखल घेत राज्य सरकारसह एमएमआरमधील सर्व महानगरपालिकांना नोटीस बजावली व याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रदीप बैस यांनी वकील उदय वारूंजीकर यांच्यामार्फत ही जनहित याचिका केली आहे. हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.
साल 2008 पूर्वी पुलांच्या खाली असलेल्या मोकळ्या जागा वाहनतळांसाठी वापरल्या जात होत्या. मात्र, गाड्यांना आग लागण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे पुलांच्या खाली वाहनतळाची सुविधा उपलब्ध करू नये, असं मत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर, महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियमाच्या कलम 56 नुसार, सरकारनं साल 2009 मध्ये पुलांखाली वाहनतळांना परवानगी न देण्याबाबतचा आदेश काढण्यात आला. या आदेशात रस्त्याच्या दुतर्फा गाड्या उभ्या करण्यासही मज्जाव करण्यात आला.
सध्या एमएमआर क्षेत्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकासाशी निगडीत बांधकामं केली जात आहेत. त्यामुळे एमएमआर क्षेत्रात वाहनतळांसाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे पुलांच्या खालील मोकळ्या जागेचा वाहनतळासाठी वापर करण्यात यावा, अशी मागणी याचिकेतून याचिकाकर्त्यांनी केली आहे. या वाहनतळाचा सरकार आणि महानगरपालिकांना महसूलासाठीही फायदा होऊन सरकारी तिजोरीतही वाढ होईल, असा दावाही बैस यांनी याचिकेतून केला आहे
मुंबईत लवकरच बनवण्यात येणार 5 हजार 560 मीटर लांबीचा पूल
दरम्यान, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरळीत व्हावा यासाठी लवकरच तब्बल 5.56 किलोमीटर लांबीचा पूल अर्थात मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. 5 हजार 560 मीटर लांबीचा हा पूल प्रत्यक्षात आणण्यासाठीची प्रशासकीय कार्यवाही महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी केली आहे. तसेच याबाबतची निविदा नुकतीच प्रकाशित झाली आहे. निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाल्यापासून बांधकाम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 42 महिन्यांचा कालावधी अंदाजित आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्याद्वारे देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पूल खात्याद्वारे सांगितलं आहे की, प्रस्तावित मार्ग हा दक्षिण मुंबईतील (Mumbai) पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट नजिक सुरु होणाऱ्या या ईस्टर्न फ्री-वे येथून प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग ग्रँट रोड स्टेशन परिसरापर्यंत असणार आहे. ईस्टर्न फ्री-वे ते ग्रँटरोड स्टेशन परिसर या सुमारे 5.56 किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी सध्या 30 मिनिटे ते 50 मिनिटे एवढा कालावधी लागतो. मात्र भविष्यात हे अंतर कापण्यासाठी हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाल्यानंतर तेवढ्याच अंतरासाठी केवळ 6 ते 7 मिनिटे लागतील.