मुंबई : मुंबईत मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव आज (5 जुलै) पहाटे 6 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. 545 कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.


दिलासादायक बाब म्हणजे पवई तलाव भरल्याने औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध झाल्याने तेथे पाणी कपात होणार नाही. मात्र तलाव ओव्हर फ्लो झाल्याने तलावाचं पाणी मीठी नदी पात्रात जातं. त्यामुळे मीठी नदीची पाणी पातळी वाढणार आहे. त्यामुळे मीठी नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे.


पवई तलावाबाबत महत्त्वाची माहिती


या कृत्रिम तलावाचे बांधकाम 1890 मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 12.59 लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 चौरस किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 2.23 चौरस किलोमीटर एवढे असते. तलावाची पूर्ण भरून वाहण्याची पातळी ही 195 फूट आहे. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये 545.5 कोटी लिटर पाणी असते. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.


Water logging in Mumbai | सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत 'कोसळधार'; मुंबईतील रस्ते जलमय