मुंबई : दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस चौकशी करणार आहे. दादर नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत सोमवारी आत्महत्या केली होती. त्या ठिकाणी 16 पानांचे पत्र सापडले आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी त्यांना होणार त्रास त्यांना मिळणारी वागणूक याबाबत लिहिले होते. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. स्थानिक भाजप नेत्यांकडून आपल्याला त्रास दिला जात होता. आपल्यावर खोट्या केसेस टाकल्या जात आहेत, अशा तक्रारी मोहन डेलकर यांनी यापूर्वी केल्या होत्या, असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितलं.


डेलकर आणि त्यांच्या समर्थकांवर खोट्या केसेस टाकल्या गेल्या होत्या. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा वरुन आदेश असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. डेलकर यांना नाहक त्रास दिला जात होता, असं सचिन सावंत यांनी सांगितलं. लोकसभा अधिवेशनादरम्यान मी राजीनामा देणार आहे, असंही डेलकर यांनी सांगितलं होतं. डेलकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्यामुळे याचा योग्य तपास करुन कारवाई होणे गरजेचं आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं.


भाजपचे गुजरातमधील माजी आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव डेलकर यांनी आपल्या 16 पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. प्रफुल्ल पटेल सध्या दादरा नगर हवेलीत प्रशासक आहेत. डेलकर यांच्यावर भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यांनी मुंबईत आत्महत्या केली, दादरा नगर हवेलीत आत्महत्या केली असती तर मृत्यूनंतर त्यांना न्याय मिळाला नसता, असं त्यांना कदाचित वाटलं असेल, असं सचिन सावंत यांनी म्हटलं. त्यामुळे भाजपचा या आत्महत्येमागे काय हात आहे? याचा तपास करुन डेलकर यांच्या कुटुंबियांना न्याय दिला पाहिजे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं.


चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करणार : अनिल देशमुख


मोहन डेलकर यांच्या आत्महत्येबाबत महत्त्वाचे निवेदन सचिन सावंत यांनी दिलं आहे. मोहन डेलकर मोठे नेते होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी अनेकांची नावं सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत. भाजप नेते प्रफुल पटेल यांच्यावर केंद्राचा दबाव होता का? या सर्व त्रासामुळे डेलकर यांनी आत्महत्या केली का? याचा तपास केला जाईल. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.


संबंधित बातमी


दादरा, नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या