मुंबई : आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या महिलेला त्यापासून परावृत्त करण्यात मुंबई पोलिसांच्या महिला ब्रिगेडला शक्य झालं आहे. शुक्रवारी सकाळी 7 वाजता वडाळ्यात एका बांधकाम सुरु असलेल्या बिल्डिंगवर तब्बल तीन तास हा ड्रामा सुरु होता.

शुक्रवारी वडाळ्यातील 30 वर्षीय वकील महिला इमारतीच्या 18 व्या मजल्यावरुन उडी मारण्याच्या बेतात होती. त्यावेळी शेजारील एका इमारतीतल्या रहिवाशाने तत्काळा पोलिसांना फोन करुन याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती पोलिसांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. विशेष म्हणजे, या वकील महिलेनं आपल्या आत्महत्येचा व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्याचीही तयारी केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी बिल्डिंगखाली सुरक्षा जाळी लावली आणि  समुपदेशनात हातखंडा असलेल्या पोलिस निरीक्षक शालीनी शर्मांना पाचारण करण्यात आलं. शर्मांनी तब्बल तीन तास महिलेशी संवाद साधत आपल्या कौशल्यानं एक जीव वाचवला. शर्मांच्या कामाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, त्या महिला वकीलाला ताब्यात घेऊन, परळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. तसेच आत्महत्येसाठी परावृत्त करण्यासाठी डॉक्टरांकडून तिचं समुपदेशन केलं जात आहे.

गेल्या महिन्यात एका 23 वर्षीय विद्यार्थीनीने वांद्र्यातील एका 19 मजली हॉटेलच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. यावेळी त्या विद्यार्थीनीने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या आत्महत्येचं लाईव्ह स्ट्रीमिंग केलं होतं.