मुंबई : अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीवर लागलेल्या वसुलीच्या आरोपांचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक अपराध शाखेने (EOW) सुरु केला आहे. आतापर्यंत तीन जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 8 मार्च रोजी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी आरोप केला होता की, "ईडी तपासाच्या नावावर लोकांकडून वसुली करत आहे." या प्रकरणात संजय राऊत यांनी जितू नवलानी नावाच्या व्यापाऱ्यावरही आरोप केले होते. शिवसेना नेते अरविंद भोसले यांनी या प्रकरणात त्याच दिवशी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर मुंबई पोलिसांची आर्थिक अपराध शाखेने कारवाईला सुरुवात केली आहे.


या प्रकरणाचा तपास करताना EOW ने त्या तक्रारीत नोंद असलेल्या कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित लोकांना नोटीस पाठवून जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याची सूचना केली आहे.


EOW च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला माहिती दिली. "आम्ही या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांचा जबाब नोंदवला आहे. याशिवाय आणखी काही लोकांचा जबाब नोंदवून त्यांच्या कंपन्यांना पैसा कुठून मिळाला याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करु,"
असं ते म्हणाले.


सुत्रांच्या सांगितलं की, "सध्या EOW ने जितू नवलानी आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस पाठवलेली नाही. या प्रकरणात EOW काही गोष्टींचा अभ्यास करत आहे, जेणेकरुन झालेले आरोप खरे असतील तर गुन्हा दाखल झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई कशी करावी हे ठरवता येईल."


दरम्यान अरविंद भोसले यांनी आपल्या तक्रारीत 70 कंपन्यांची एक यादी सोपवली होती. "या कंपन्यांकडून पैशांची वसुली करुन ते सात विविध कंपन्यांमध्ये ट्रान्सफर केले होते. या कंपन्यांनी लिंक जितू नवलानीशी जोडलेली आहे," असं तक्रारीत म्हटलं होतं. तक्रारीत असाही आरोप केला होता की, "आतापर्यंत सुमारे 59 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. सोबतच कोट्यवधी रुपये जितू नवलानीला दिले आहेत."


अरविंद भोसले यांच्या तक्रारीत असाही आरोप केला आहे की, "यापैकी काही पैसे ईडीच्या काही अधिकाऱ्यांनाही दिले आहेत, जे वसुलीच्या टीममधील सदस्य आहे." दरम्यान या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.