मुंबई : "पोलीस निरीक्षक सुनील माने आपल्या मित्राकडून पांढऱ्या रंगाची फॉक्सवॅगन कार घेऊन आला होता, जी मनसुख हिरण यांच्या अपहरण आणि हत्येसाठी वापरली होती," असा उल्लेख सुनील मानेला सेवेतून बडतर्फ केल्याच्या आदेशात करण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार सुनील मानेने मुख्य आरोपी एपीआय सचिन वाझेकडील मोबाईल फोन आणि सिमकार्ड गोळा केले होते आणि मनसुख हिरण यांचं अपहरण करण्यासाठी त्यांचा वापर केला होता. महत्त्वाचे म्हणजे, मानेने कांदिवली इथले पोलीस निरीक्षक तावडे यांचं नाव वापरुन मनसुख हिरण यांना फोन करुन बोलावले होतं. घराबाहेर बोलावल्यानंतर सुनील माने मनसुख हिरणला त्या ठिकाणी गेला जिथे त्यांची हत्या करण्यात आली होती.
सुनील मानेला सस्पेंड करण्यात आलेल्या ऑर्डरमध्ये पुढे म्हटलं आहे की, "मानेच्या घरातून एनआएला काही संशयास्पद कागदपत्रे मिळाली आहेत. तर एनआयएने सिद्धार्थ सिक्युरीटी अँड डिफेन्स कार्यालयाचीही झडती घेतली जी सुनील मानेशी संबंधित आहे. या कार्यालयात चार गाड्यांची नोंदणी केलेले कागदपत्रांची झेरॉक्स, तीन अॅग्रीमेंट कॉपीची प्रत, ऑफिस आणि तीन बँकांचे पासबुक सापडले आहेत." इतकंच नाहीतर सुनील मानेच्या चौकशीमध्ये ठाणे आणि पालघर या जागांचाही उल्लेख आहे, जिथे गुन्ह्याशी संबंधित गोष्टी घडल्याचा संशय एनआएला आहे.
एनआयएच्या तपासात असं सुद्धा समोर आलं आहे की ज्या दिवशी मनसुख हिरण यांची हत्या झाली त्या दिवशी आपली ओळख लपवण्यासाठी सुनील मानेने मोबाईल फोन आपल्यासोबत नेला नव्हता. इतकंच नाही तर आपला मोबाईल आणि बॅग एका सहकाऱ्याकडे देऊन ती घरी ठेवण्यास सांगितले, जेणेकरुन पुढे जाऊन तपास यंत्रणाची दिशाभूल करणं सोपं होईल.
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काढलेल्या ऑर्डरमध्ये सुनील मानेने आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्याचं नमूद केलं आहे. तसेच एक जबाबदार अधिकारी म्हणून मानेने वागायला हवं होतं पण सुनील माने यांनी मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलीन होईल असं कार्य केलं जे आहे अक्षम्य आहे. इतकंच नाही तर सुनील मानेचं हे कृत्य एका सराईत गुन्हेगाराप्रमाणे आहे जे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे सुनील मानेला बडतर्फ केल्याचं हेमंत नगराळे यांनी ऑर्डरमध्ये सांगितले आहे.