मुंबई : मुंबईतील महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर आज (3 जून) लसीकरण बंद राहणार आहे. मुंबई महापालिकाने याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. तसंच नागरिकांच्या गैससोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करुन लसीकरण केंद्र आणि वेळापत्रकाविषयी पुढील सूचना देऊ. मात्र लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येऊ इच्छिणाऱ्यांनी गुरुवारी लसीकरण केंद्रावर येणं टाळावे; असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.


दरम्यान शहरातील लसीकरण आज बंद का ठेवलं याचं कारण महापालिकेने ट्वीटमध्ये दिलेलं नाही. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे आज महापालिका आणि शासकीय केंद्रांवर लसीकरण होणार नसल्याचं कळतं. मिळालेल्या माहितीनुसार लसीचा पुरवठा आजच होईल परंतु उद्या लसीकरण सुरु होईल, अशी शक्यता आहे.






उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु आज लसीकरण बंद असल्याने या विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत आहे. परदेशातील काही विद्यापीठांनी लसीकरण बंधनकारक केलं आहे. तर काही विद्यापीठ ज्या विद्यार्थ्यांनी लस घेतली नसेल तर त्यांच्यासाठी परदेशात लसीकरण करत आहेत.


याआधीही मुंबईत लसीकरण बंद ठेवण्याचा किंवा मर्यादित लसीकरण केंद्र सुरु आणि इतर लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा प्रकार घडला आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये यासाठी मुंबई मनपाने नागरिकांना 2 जून रोजी रात्री नऊच्या सुमारास ट्वीट करुन लसीकरण केंद्र बंद ठेवणार असल्याचं सांगितलं.


मुंबईत गेल्या 24 तासात 925 कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईत गेल्या बुधवारी (2 जून) 925 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1632 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आतापर्यंत 6,74,296 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16580 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 477 दिवसांवर पोहोचला आहे.