मुंबई : गणेशोत्सव आणि मोहरमसाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. दरवर्षी गणेशोत्सव बंदोबस्तासाठी हजारोंच्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात केले जातात. मात्र यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे बहुतांश गणेश मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे दरवर्षी लागणारा पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावर्षी कमी प्रमाणात लागणार आहे.
महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण असणारा गणेशोत्सव आता अवघ्या काही तासांवर आला असताना मुंबई पोलिसांनी गणेशोत्सव सण साजरा करणाऱ्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे. तसेच मोहरम सणानिमित्त सुद्धा नियमावली जाहीर करण्यात आली आहे. गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मुंबई पोलिसांकडून प्रामुख्याने सांस्कृतिक कार्यक्रम न घेता आरोग्य शिबीर राबवण्याची विनंती मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे.
22 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर 21 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत मोहरम साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी या सणांसाठी पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात करावा लागतो. मात्र यंदा पोलिसांचा बंदोबस्त मोजक्या प्रमाणात असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमका कुठल्या नियमावली मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहेत.
सार्वजनिक गणेश मूर्तीची उंची चार फूट असेल तर घरगुती गणपतीची मूर्ती दोन फुटाचे ठेवण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहेत. विसर्जनाच्या दिवशी आरती आणि पूजा विसर्जनस्थळी न करता घरीच करण्यात यावी. गणेशोत्सव करता महानगरपालिकेकडून 167 कुत्रिम तलाव बनवण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक विभागाच्या सहाय्यक महापालिका आयुक्त यांनी गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारली आहेत. ज्या ठिकाणी आपले गणेश मूर्ती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिली जाईल आणि ते त्याचं विसर्जन करतील.
कोरोनाची परिस्थिती पाहता रस्त्यावर गर्दी करु नये. नैसर्गिक विसर्जन स्थळे येथे विनाकारण जाणे टाळावे आणि गर्दी करू नये. तसेच ध्वनिप्रदूषण टाळावे. सांस्कृतिक कार्यक्रम न घेता आरोग्य शिबिरं राबविण्यात यावीत. त्यामुळे हे सण शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्याची अशी दुहेरी जबाबदारी मुंबई पोलिसांवर असणार आहे आणि त्याला चोखपणे बजावण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत. मात्र हे सण शांततेत आणि सुरक्षित पार पडण्यासाठी नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आला आहे.
Nashik Silver Bappa | लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती, नाशिकचा राजा; विविध रुपातील चांदीचे बाप्पा