मुंबई : मंत्रालयात मारहाण झालेल्या शेतकऱ्याविषयी पोलिस विरोधकांना चुकीची माहिती देत असल्याचं समोर आलं आहे. शेतकरी रामेश्वर भुसारे पोलिस स्टेशनमध्ये असतानाही त्यांना कोर्टात नेल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत होतं.


गारपिटीची नुकसान भरपाई मागणासाठी आलेल्या रामश्वेर भुसारे यांना गुरुवारी मंत्रालयात बेदम मारहाण झाली होती. जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असं सांगत भुसारे यांनी तिथेच ठिय्या मांडला. पण ते जात नाहीत असं पाहून तिथल्या सुरक्षा रक्षकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप भुसारेंनी केला आहे.

नुकसान भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्याला मंत्रालयात बेदम मारहाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्वत: कॉल करुन रामेश्वर भुसारे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी शाहनिशा केल्यावर भुसारे मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्येच असल्याचं पवारांना समजलं. त्यानंतर अजित पवार पोलिस निरीक्षकांवरही संतापले.

दरम्यान, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये जाऊन मारहाण झालेले शेतकरी रामेश्वर भुसारे यांची भेट घेतली. शेतकऱ्याची बाजू ऐकून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.