मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा विधानसभेत डॉक्टरांच्या संपाबाबत निवेदन दिलं.
डॉक्टर आता कामावर परत आले नाही तर कायदेशीर कारवाई करू, सरकार हातावर हात धरून बसणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
हात जोडले, पण तरीही असंवेदनशीलता कायम
डॉक्टरांसोबत शक्य ती सर्व चर्चा केली. विनंती केली, हात जोडले, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास राजीनामा देण्याची तयारी दाखवली, तरीही डॉक्टर सेवेत येत नसतील तर ती असंवेदनशीलता आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
ज्यांच्या पैशावर शिकता, त्यांना मरणाच्या दारात सोडू नका
टॅक्सपेअरच्या पैशातून डॉक्टरांना शिकवतो. सामान्य नागरिक सरकारच्या तिजोरीत टॅक्सरुपी जो पैसा भरतो, त्यातून डॉक्टरांचं शिक्षण होतं. मात्र तरीही त्याच जनतेला मरणाच्या दारात सोडत असाल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
शपथ विसरुन लोकांना मरणाच्या दारात सोडाल, तर तुम्हाला देवाऐवजी दानव म्हटलं जाईल. सरकारने आणखी किती संयम दाखवणं अपेक्षित आहे, असा उद्विग्न सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.
वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर, स्टाफवर हल्ला करण निंदनीय आहेच. त्याच्याविरोधात कायदा तयार केला आहे. काही चूक आढळली तर तक्रार करु शकता, पण डॉक्टरांवर हल्ला करू नये, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
"डॉक्टरांसोबत आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि मी स्वत: चर्चा केली. वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणाले डॉक्टरांच्या मागण्या मान्य न झाल्यास 15 दिवसात मी राजीनामा देईन. इतकं करुन तुम्ही कामावर येत नसाल तर ही असवेंदनशीलता आहे" , असं मुख्यमंत्री म्हणाले.