Mumbai Air Pollution : दिल्ली (Delhi), मुंबईसह (Mumbai) देशभरातील महत्त्वाच्या शहरांमधील वाढतं वायू प्रदूषण (Air Pollution) दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. अशातच याप्रकरणी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai News) आता पोलिसांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या वायू प्रदूषणाप्रकरणी (Air Pollution) मुंबई पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं आणि शहरात वायू प्रदूषण निर्माण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध पहिला गुन्हा दाखल केला आहे. 


मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एका बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं नागरी संस्थेवर जोरदार टीका केली. त्यानंतर बीएमसीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी बिल्डरविरुद्ध नोंदवलेला हा पहिला एफआयआर आहे. सांताक्रूझ पोलिसांनी सोमवारी भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 291 (बंद करण्याच्या आदेशानंतर उपद्रव चालू ठेवणं) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


BMC कडून आरोपींना 354A बीएमसी कायद्यांतर्गत नोटीस


पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, बिल्डर भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपल्या बांधकाम साईटवर 25 फुट उंचीचा पत्रा लावलेला नाही आणि बांधकामाच्या ठिकाणी योग्य काळजी घेतलेली नाही. त्यामुळे लोकांना धूळ किंवा इतर गोष्टींच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. म्हणून बीएमसीनं आरोपींना 354A बीएमसी कायद्यांतर्गत नोटीस बजावली असून त्याची एक प्रत सांताक्रूझ पोलीस स्टेशनलाही देण्यात आलेली आहे.


दरम्यान, प्राप्त तक्रारीनुसार, आरोपींनी बांधकामाच्या ठिकाणी 25 फूट उंचीचा पत्रा न टाकता पुन्हा बांधकाम सुरू केलं, ज्यामुळे लोकसेवकाच्या आदेशाचं उल्लंघन झालं आणि म्हणून बीएमसीचा तक्रारीवरून बिल्डर भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.