मुंबई : मुंबई महापालिकेने (BMC Covid Scam) खरेदी केलेल्या डेड बॉडी बॅग (Dead Body Bag) खरेदी प्रकरणातील कथित घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Mumbai Police EOW) आज माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची दोन तास चौकशी केली. किशोरी पेडणेकर यांच्या बँक खात्यांची तपासणी आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जाण्याची शक्यता आहे अशी सूत्रांनी माहिती दिली. किशोरी पेडणेकर या चौकशीला सहकार्य करत असून पुढच्या सुनावणीमध्ये म्हणजे शनिवारी सप्टेंबर 16 रोजी त्यांना काही कागदपत्रे घेऊन येण्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोना काळातील डेड बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आज दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. कोरोनामुळे मृत झालेल्या मृतदेहांसाठी बॉडी बॅग खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेने बाजार भावापेक्षा अव्वाच्या सव्वा दराने ही डेड बॉडी बॅग खरेदी करण्यात आले असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेचे अधिकाऱ्यांसह आता तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कथित घोटाळा प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने 5 ऑगस्ट रोजी पेडणेकर, कंत्राटदार वेदांत इनोटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संचालक आणि BMC च्या काही वरिष्ठ अधिकार्यांच्या विरोधात साथीच्या काळात मृतांसाठी बॉडी बॅग खरेदी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.
किशोरी पेडणेकर यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कोणते प्रश्न विचारले?
1) कोविडमुळे मृत पावलेल्या लोकांसाठी वापरण्यात येणारी 1500 रूपयांची डेड बॉडी बॅग 6 हजार पेक्षा जास्ती रुपयांना विकत घेतली याबाबत तुम्हाला काही माहीत होते का ?
2) ठराविक कॉन्ट्रॅक्टरलाच कॉन्ट्रॅक्ट देण्याबाबत तुम्ही दबाव टाकला होता का ?
3) तुम्ही महानगरपालिकाच्या कुठल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता?
4 ) तुम्हाला यामध्ये काही कमिशन मिळाले होते का ?
5) तुमच्या या टेंडरिंग कॉन्ट्रॅक्ट प्रकरणात काही व्यवहार झाला होता का ?
6) वेदांत या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही संपर्क साधला होता का ??
अशा प्रश्नांची सरबत्ती आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली. आता पुन्हा तिसऱ्यांदा 16 सप्टेंबरला किशोरी पेडणेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.
पेडणेकर यांना 11, 13 आणि 16 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयात त्यांची चौकशी होत आहे. अटकेपासून संरक्षण देताना, मुंबई पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश पेडणेकर यांना कोर्टाने दिले होते.