Mumbai Police Wrong Side Drive : चुकीच्या बाजूने गाडी चालवताना आढळलेल्या वाहन चालकांना आता मुंबई पोलीस आयुक्तांनी (Mumbai Police Commissioner) दिलासा दिला आहे. चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर आता मोटार वाहन कायद्यांतर्गत दंड ठोठावण्यात येणार आहेत. याआधी भारतीय दंड संहितेनुसार (Indian Penal Code)  कारवाई करण्यात येत होती. आयपीसीनुसार कारवाई होत असल्याने एफआयआर (FIR) नोंदवला जात होता. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. एफआयआर झाल्याने परदेशी विद्यापीठात प्रवेश, पासपोर्ट, व्हिसासाठी अर्ज करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर मुंबई पोलीस आयुक्तांनी आयपीसी अंतर्गत गुन्हा न नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. 


माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या कार्यकाळात  चुकीच्या बाजूने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली. पांडे यांच्या आदेशानुसार, प्रत्येक वाहतूक विभागाला चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याबद्दल दररोज किमान 5 एफआयआर नोंदवण्यास सांगण्यात आले होते. बेशिस्त वाहन चालकांना केवळ कठोर उपायांनीच शिस्त लागेल आणि रस्ता सुरक्षा चांगली होईल, असा दावा पांडे यांनी केला होता.


मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी हा आदेश मागे घेण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर आता मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाने या प्रकरणातील दोषींवर दंडात्मक कारवाई केली तरी त्यांना भविष्यात त्रास होण्याची शक्यता आहे. नियम मोडणाऱ्यांमध्ये बहुतांशी तरूण असतात. त्यामुळे त्यांना पासपोर्ट, सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. नियम मोडणारे हे बहुसंख्य तरुण असल्याने त्यांचे नुकसान होऊ नये असे मत मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 


पोलीस आयुक्त फणसळकर यांनी सांगितले की, आम्ही चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याबद्दल एफआयआर नोंदवत असल्याने लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती.  पासपोर्ट, व्हिसासाठी तसेच परदेशी विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज करताना त्यांना समस्या निर्माण होत होती. आता एफआयआर नोंदवण्याचा आदेश मागे घेतल्याने कोणतीही अडचण समोर येणार नाही. मात्र, कोणी स्टंट करताना दिसल्यास त्या व्यक्तीविरोधात रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.