मुंबई :  मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पहिल्यांदाच महादेव बेटिंग अॅपचा (Mahadev App) प्रवर्तक सौरभ चंद्राकर (Saurabh Chandrakar) याच्यासह 31 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जुगार, फसवणुकीच्या कलमातंर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा गुन्हा महादेव अॅपऐवजी खिलाडी हे बेकायदेशीर बेटिंग अॅप चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनकर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने माटुंगा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


त्यानुसार प्रकाश बनकर यांच्या फिर्यादीवरून माटुंगा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468, 471, 120 (ब) आणि जुगार कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनकर यांचा दावा आहे की या आरोपीने खिलाडी बेटिंग अॅप वापरून सरकार आणि इतर अनेक लोकांची 15,000 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. खिलाडी अॅपच्या साहाय्याने आरोपी जुगार आणि इतर खेळ खेळत होते आणि त्यांनी करोडोंची कमाई केली असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, सौरभ चंद्राकर, रवी उप्पल यांच्यावर यापूर्वी छत्तीसगड पोलिसांनी विविध प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता आणि त्यांच्याविरुद्ध ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. 


कोण आहे सौरभ चंद्राकर?


सौरभ हा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहे. सौरभनं त्याचा मित्र रवी उप्पलसोबत 'महादेव ऑनलाईन अॅप' सुरू केलं होतं. या अॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. त्याच्याशाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघड झाले.


काय आहे महादेव अॅप प्रकरण?


बहुतेक सट्टेबाजी व्हॉट्सअॅप नंबरवरून केली जाते आणि एजंट, विविध पॅनल बनवून कमिशन तत्त्वावर कॉल सेंटर चालवत आहेत. महादेव बुक अॅपचा मुख्य कार्यालय यूएईमध्ये असून ते मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल चालवतात.  केवळ क्रिकेट सट्टेबाजीवरच नाही तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांवर सट्टेबाजीसाठीही या अॅपचा वापर केला जात होता. महादेव बुक अॅपसाठी काम करणारे बहुतेक कर्मचारी छत्तीसगडचे आहेत, जे सौरभ आणि रवी उप्पल यांना ओळखतात आणि ते दुबई आणि यूएईमध्ये स्थायिक झाले आहेत.


यावर्षी ऑगस्टमध्ये महादेव बेकायदेशीर सट्टेबाजी अॅप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं अटक केलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) चंद्रभूषण वर्मा यांनी सांगितलं होतं की, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मित्रानं हवाला व्यवहाराद्वारे पैसे मिळवले होते, ED द्वारे दाखल आरोपपत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे.