मुंबई पोलिसांची कमाल, फिल्मी स्टाईलने चोरांना पकडलं!
एबीपी माझा वेब टीम | 02 Feb 2018 10:41 AM (IST)
मुंबईतलं वरळी पोलीस स्टेशन हे सध्या जिगरबाज कॉन्स्टेबलच्या कामगिरीनं चांगलंच चर्चेत आलं आहे.
मुंबई : मुंबईतलं वरळी पोलीस स्टेशन हे सध्या जिगरबाज कॉन्स्टेबलच्या कामगिरीनं चांगलंच चर्चेत आलं आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन शिंदे यांनी कमला मिलच्या आगीत दाखवलेल्या बहादुरीनंतर त्याच पोलीस स्टेशनमधील दोन कॉन्स्टेबल्सनी फिल्मी स्टाईलनं चोरांचा पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (पोलीस कान्स्टेबल किरण काशिद) पोलीस कान्स्टेबल किरण काशिद आणि दीपक भोसले हे बीकेसी रोडवरुन जात असताना त्याचवेळी एक चोर एका व्यक्तीचा मोबाईल चोरुन पळत होता. ही घटना पोलीस कॉन्स्टेबल किरण काशिद आणि दीपक भोंसले यांच्यासमोरच घडली. त्यामुळे त्यांनी थेट या चोराचा पाठलाग सुरु केला. याचवेळी त्या चोराच्या मदतीला एक रिक्षाही आली. त्यामुळे हा चोर एकटा नसून ही टोळी असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी एकाच वेळी चोराचा आणि रिक्षाचा पाठलाग सुरु केला. कॉन्स्टेबल किरण काशिद यांनी धावत जाऊन मोबाईल चोराला पकडलं तर दीपक भोसले यांनी आपल्या गाडीच्या मदतीने रिक्षा चालकाला अडवून त्यालाही ताब्यात घेतलं. (पोलीस कान्स्टेबल दीपक भोसले) हा संपूर्ण थरार एका सिनेमातल्या सीनपेक्षा कमी नव्हता. रिल लाईफमधले हिरो रियल लाईफमध्येही असतात हेच पोलीस कॉन्स्टेबल किरण काशिद आणि दीपक भोसले यांनी यानिमित्तानं दाखवून दिलं. VIDEO :