मुंबई : शिवसेनाप्रमुख (Shivsena) दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादरच्या (Mumbai) शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर लाल रंग टाकल्याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आलीय. उपेंद्र गुणाजी पावसकर असे आरोपीचे नाव असून गुन्हा केल्याचे त्याने कबूल केल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ लाल रंग टाकून विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शिवसेनेकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. तर, दोन्ही ठाकरे बंधूंनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती.
शिवाजी पार्क येथे उभारलेल्या स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. मुंबईत विविध जिल्ह्यात शिवसैनिकांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. तर, राजकीय नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया देत आरोपीच्या अटकेची मागणी केली होती. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही पुतळास्थळाची पाहणी करत 24 तासांत आरोपीला बेड्या ठोका असे म्हटले होते. तर, उद्धव ठाकरे यांनीही पाहणी करत पोलिसांना सूचना केल्या होत्या. तसेच, सदर प्रकार दोन प्रकारच्या व्यक्ती करु शकतात. त्यामधील पहिलं म्हणजे स्वत:च्या आई-वडिलांचं नाव घ्यायला शरम-लाज वाटणाऱ्या लावारिस लोकांनी हे कृत्य केलं असेल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. तसेच दुसरं म्हणजे बिहारमध्ये ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा अपमान झाला, म्हणून बिहार बंद करण्याचा एक असफल प्रयत्न केला गेला. त्याप्रमाणेच हा सर्व प्रकार करुन महाराष्ट्र पेटवण्याचा उद्देश असू शकतो, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले होते.
आरोपीचा धक्कादायक खुलासा
पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने जबाबात धक्कादायक माहिती दिली आहे. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आरोपीने केला आहे. दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा, अशी सूत्रांची माहिती आहे. आता, आरोपीचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
कोणालाही सोडणार नाही - शिंदे
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना संबंधित घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला होता. ही घटना अतिशय निंदनीय आहे, कोणालाही सोडले जाणार नाही. यासंदर्भात मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे, मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष घातले आहे, ही बाब गांभीर्याने घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. कोणत्याही परिस्थिती त्या समाजकंटकाला सोडले जाणार नाही, असे शिंदेंनी स्पष्ट शब्दात सांगितले.
हेही वाचा
साप चावल्याची आरडोओरडा करत टॅक्सी थांबवली; मुंबईतील व्यवसायिकाची वरळी सी-लिंकवरु उडी