मुंबई: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मॉरिस नोरोन्हा (Mauris Noronha) या गुंडाने दहिसरमधील एका कार्यक्रमादरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचा जागीच मृत्यू झाला होता. घोसाळकरांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापल्याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरु आहे. गुन्हे शाखेने मॉरिस नोरोन्हा याचा अंगरक्षक असलेल्या अमरेंद्र मिश्रा (Amrendra Mishra) याला अटक केली होती. याच अमरेंद्र मिश्राच्या बंदुकीतून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
पोलिसांकडून कालपासून अमरेंद्र मिश्रा याची चौकशी सुरु आहे. मिश्राला शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी त्याची चौकशी करण्यासाठी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. यानंतर न्यायालयाने त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अमरेंद्र मिश्र याने न्यायालयातून बाहेर पडत असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. सुनावणीनंतर पोलिसांनी मिश्रा याला बाहेर गाडीत आणून बसवले. तेव्हा अमरेंद्र मिश्राने गाडीतूनच ओरडून म्हटले की, 'मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ गलत हुआ है. मुझे फसाया गया है'. यानंतर अमरेंद्र मिश्रा आणखी काही बोलण्यापूर्वी पोलिसांनी त्याला शांत बसवून गाडी पुढे नेली. अमरेंद्र मिश्रा याच्या या वक्तव्यानंतर आता अभिषेक घोसाळकर मृत्यूप्रकरणाला कोणते नवे वळण लागते का, हे पाहावे लागेल. अमरेंद्र मिश्रा याच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिस नोरोन्हा याने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. मात्र, यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध रंगले आहे. उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर यांची हत्या मॉरिसनेच केली का, याविषयी शंका व्यक्त केली. फेसबुक लाईव्ह सुरु असताना अभिषेक घोसाळकर यांच्यावर समोरून पाच गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र, कॅमेऱ्यामागून गोळ्या झाडणारी व्यक्ती मॉरिस हाच होता का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता पोलीस तपासात कोणती माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
घोसाळकर हत्येमागे सत्ताधारी महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात, माझ्याकडे इनपुट्स : विजय वडेट्टीवार
अभिषेक घोसाळकर हत्याकांडाचा 'ट्रिगर पॉईंट', मॉरिसने टोकाचं पाऊल का उचललं? हत्येमागची इनसाईड स्टोरी