मुंबई: मुंबई पोलिसांना आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे. कारण मुंबई पोलिसांची ड्युटी आता 8 तासांची करण्यात आली आहे.

‘मिशन 8 अवर्स’ या कार्यक्रमात मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ही घोषणा केली.

मुंबई पोलिसांना कामाचे तास नाहीत. एकदा घरातून बाहेर पडलेला पोलिस कधी 12 तासांनी, कधी 16 तर कधी 24 तासांनी घरी परततो. त्यामुळे पोलिसांचं आरोग्य, मानसिकता, कौटुंबिक आयुष्य या सर्वांवर त्याचा विपरित परिणाम होतो.

ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे, तेच एकप्रकारे असुरक्षित आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामाचे तास निश्चित करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती.

त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अखेर पोलिसांच्या कामाचे तास निश्चित केले आहेत. 8 तासांची शिफ्ट याआधी प्रायोगिक तत्वावर देवनार पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून मुंबईतल्या सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये 8 तासांच्या शिफ्टची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.