मुंबई : मुंबई ही जशी स्वप्ननगरी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे तसंच गर्दीचंही शहर आहे. इथे माणसांची जेवढी गर्दी आहे तेवढीच वाहनांची देखील आहे. परिणामी मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या ही कायमचीच आहे. त्यातच दादर परिसरात खरेदीसाठी गाड्या घेऊन येणाऱ्या ग्राहकांचीच संख्या शेकडोंनी असतेमात्रखरेदी करताना गाड्या  कुठेहीकशाही उभ्या केल्या जात असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. यावर तोडगा म्हणून मुंबईतील दादर परिसरात डिजिटाईज्ड व्हॅले पार्किंग (Digitised Valet Parking) सुविधा सुरु झाली आहे. मुंबई महापालिका, मुंबई पोलीस आणि दादर व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज (18 मे) दादरमध्ये पहिली डिजिटाईज्ड व्हॅले पार्किंग सुविधा सुरु करण्यात आली आहे. 


वाहनधारक त्यांची वाहनं त्यांच्या फोन नंबरसह प्लाझा सिनेमाजवळील व्हॅले पार्किंग बूथवर सोडू शकतात. सर्व वाहने कोहिनूर सार्वजनिक पार्किंग लॉटपर्यंत नेली जातील. जेव्हा परत जाण्याची वेळ येईल, तेव्हा वाहनचालक एसएमएसद्वारे पाठवलेल्या लिंकवर क्लिक करुन त्यांचे वाहन प्लाझा सिनेमाजवळ आणण्याची विनंती करु शकतात. पहिल्या चार तासांसाठी 100 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक तासासाठी अतिरिक्त 25 रुपये आकारले जातील. पार्क+ (Park +) हे एक स्टार्ट-अप दररोज 11 तास बूथ चालवेल.


प्लाझा सिनेमाजवळ आज पहिलं बूथ उघडल्यानंतर डिजिटाईज्ड व्हॅले पार्किंग सेवा लवकरच दादर आणि शिवाजी पार्कमधील आणखी चार ठिकाणी विस्तारित केली जाईल. मुंबई महापालिका 29 सार्वजनिक पार्किंग लॉट्स (PPL) चालवते, परंतु याचा वापर फारच कमी जण करतात. बहुतांश वाहनचालक रस्त्यावर पार्किंग करतात.


"दादर हे खरेदीचं आणि सिनेमा-नाट्यगृहांचं केंद्र आहे. पण वाहनचालकांना पहिल्यांदा पीपीएलकडे जाऊन नंतर खरेदी करणं गैरसोयीचं वाटतं. शिवाय रस्त्यावर पार्किंग केल्याने वाहनं उचलून घेऊन जाण्याची भीती नेहमीच असते. मागील वर्षी सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांनी तीन महिने मोफत व्हॅले पार्किंगची व्यवस्था केली होती. याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. दररोज सरासरी 85 कार व्हॅलेद्वारे पार्क केल्या जात होत्या. दिवाळीच्या दिवशी ही संख्या 94 वर पोहोचली होती, अशी माहिती दादर व्यापारी संघाचे दीपक देवरुखकर यांनी दिली. त्यानंतर, व्यापार्‍यांच्या संघटनेने पार्क+ (Park +) या स्टार्ट-अपशी हातमिळवणी केली.


दादर व्यापारी संघाचे सुनील शहा म्हणाले की, "फक्त दुकानदारच नाही, दादर आणि शिवाजी पार्कला येणारे, मित्रांसोबत बाहेर जेवायला गेलेले कोणीही व्हॅले  पार्किंगचा लाभ घेऊ शकतात."


"आम्ही लग्नाचे हॉल आणि शॉपिंग सेंटर्सच्या बाहेरील रस्त्यावरील पार्किंग बंद करु. आमच्याकडे कोहिनूर पीपीएलमध्ये 1 हजार 721 कारसाठी जागा आहे. लग्नाचे हॉल आणि शॉपिंग सेंटर्सना आवाहन केलं आहे की त्यांनी अभ्यागतांना व्हॅले पार्किंग सुविधा वापरण्यास सांगावं," असं मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं.


मुंबईतील पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुंबई पार्किंग प्राधिकरणाच्या सदस्यांनी सांगितलं की, "जिथे पीपीएलची जागा कमी आहे तेथे व्हॅले पार्किंगला प्रोत्साहन दिलं पाहिजे. शहराच्या इतर भागातही व्हॅले पार्किंग बूथ उभारावे की नाही हे वाहनचालकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे."