भिवंडी : भिवंडीत जिलानी इमारत दुर्घटना ताजी असतांनाच दापोडा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या हरिहर कंपाउंड येथे एक मजली गोदाम इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत सिक्युरिटी गार्डसह आणखी एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवांनासह, भिवंडी व ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे अग्निशमन केंद्र तसेच ठाणे आपत्ती प्रतिसाद पथक त्याच बरोबर एनडीआरएफ पथक दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य करत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले.


दापोडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत हरिहर कंपाउंड येथे गोदाम संकुल आहे. या गोदामात तळ मजल्यावर शॅडोफॅक्स ऑनलाईन पार्सल कंपनी असून या कंपनीत ऑनलाईन साहित्य पार्सल करण्यात येत होते. सुमारे 70 हून अधिक कामगार या कंपनीत कामाला असल्याची माहिती मिळत असून सोमवारी दुर्घटना झाल्यावेळी या कंपनीत सुमारे 50 ते 55 कामगार उपस्थित होते. तर पहिल्या मजल्यावर मार्क इम्पेक्स ही टीव्ही व इलेक्ट्रॉनिक साहित्याची कंपनी होती. तर गोदामाच्या दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम देखील सुरु होते.


तळ मजल्यावर काम सुरु असताना अचानक गोदामाची इमारत कोसळली व परिसरात व कंपनीत एकच गोंधळ उडाला. यावेळी 25 ते 30 कामगार धावत बाहेर पळाले. यावेळी या कंपनीत सिक्युरिटी काम करत असलेल्या सौरभ त्रिपाठी आणि ऋतिक पाटील यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सुनील कुमरा, कल्पना पाटील, रोशन पागी, अक्षय केनी, शैलेश तरे असे पाच जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी स्व इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात व ठाणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्बल सात तासानंतर बचावकार्य पथकाकडून थांबवण्यात आलं असून दोषींवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले


या दुर्घनेत कामगारांनी पार्क करून ठेवलेल्या दुचाकींसह माल भरणे व उतरण्यासाठी गोदामाला लागलेल्या कंटेनरवर इमारतीचा काही भाग कोसळल्याने या वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.