Mumbai Metro-3: मुंबईच्या दैनंदिन प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी भुयारी मेट्रो 3 ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बीकेसीसारखे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि मंत्रालय, सीएसएमटीसारखी सरकारी व ऐतिहासिक ठिकाणे आता थेट भुयारी मेट्रोमार्गे जोडली जाणार आहेत. एवढेच नव्हे, तर या प्रवासाचा कालावधी जिथे साधारण दीड तास लागतो, तो आता फक्त अर्ध्या तासात पूर्ण होणार आहे. (Mumbai News)
दहा नवी स्थानके जोडली जाणार
आत्तापर्यंत आरे-जेव्हीएलआर-बीकेसी ते आचार्य अत्रे चौक एवढा टप्पा सुरू आहे. पुढील टप्प्यात नेहरू विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, काळबादेवी, सीएसएमटी, मंत्रालय, कफ परेड अशा दहा नव्या स्थानकांचा समावेश होणार आहे. म्हणजेच उपनगर ते बेट शहराच्या टोकापर्यंत ही मार्गिका थेट जोडली जाणार आहे. यामुळे प्रवासाची साखळी मोडून लोकल-बस बदलण्याची वेळ टळेल.
प्रवास कमी खर्चात
मेट्रो-3 साठी तिकीट दरही परवडणारे ठेवले गेले आहेत. आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतचे तिकीट फक्त 40 रुपये आहे. आत्तापर्यंत लोकल आणि बेस्ट बस मिळून 47 रुपये खर्च येत होता. वातानुकूलित सोय असूनही मेट्रो प्रवास अधिक स्वस्त व वेळ वाचवणारा ठरणार आहे.
बीकेसीहून सीएसएमटी किंवा कफ परेडला पोहोचण्यासाठी आजवर किमान दीड तास लागतो. लोकल आणि बस बदलत प्रवास करावा लागतो. मेट्रो सुरू झाल्यानंतर तोच प्रवास केवळ 30 ते 35 मिनिटांत पूर्ण होईल. म्हणजे प्रवाशांचा जवळपास एक तास वाचणार आहे.
सिद्धिविनायक भक्तांसाठीही दिलासा
दक्षिण मुंबईतील रहिवाशांना सिद्धिविनायक मंदिरात जाण्यासाठी पूर्वी बस, लोकल आणि पुन्हा बस असा प्रवास करावा लागत असे. त्यासाठी सुमारे 59 रुपये खर्च होत आणि वेळही जास्त जात असे. आता मेट्रो-3 मुळे कफ परेडसारख्या भागातून थेट सिद्धिविनायक मंदिरापर्यंत 60 रुपयांत वातानुकूलित, सुखकर प्रवास होईल.
तिकीट दर
आचार्य अत्रे चौक–सीएसएमटी : ₹30
बीकेसी–सीएसएमटी : ₹50
सिद्धिविनायक–सीएसएमटी : ₹40
आचार्य अत्रे चौक–कफ परेड : ₹40
बीकेसी प्रवाशांसाठी सोय
बीकेसीहून सीएसएमटीपर्यंत पोहोचण्यासाठी आत्तापर्यंत प्रवाशांना शेअर रिक्षा, बस आणि लोकलचा वापर करून साधारण 70 रुपये खर्च करावे लागत. मेट्रो सुरू झाल्यावर तोच प्रवास केवळ 50 रुपयांत थेट शक्य होणार आहे. यामुळे आर्थिक बचत, वेळेची बचत आणि प्रवासातील त्रास कमी होणार आहे.
वाहतुकीवरील ताण कमी होणार
मेट्रो ३ मार्गिका सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबई, बीकेसी आणि विमानतळाशी शहर थेट जोडले जाईल. परिणामी रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होऊन कार्बन उत्सर्जनात घट होईल, असे एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले. मुंबईच्या वाहतुकीला वेग देणारी ही भुयारी मेट्रो प्रवाशांसाठी नवा दिलासा ठरणार आहे. शहराच्या जीवनमानात बदल घडवून आणणारा हा प्रकल्प मुंबईकरांसाठी ऐतिहासिक ठरेल, अशी अपेक्षा आहे.