मुंबई : वाहतूक नियंत्रणास पोलिसाने नकार दिल्यामुळे आमदाराने चक्क विधानभवनासमोरच ठिय्या मांडला. दापोलीचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.


वाहतूक खोळंबा होत असल्याने आमदार संजय कदम यांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना वाहतूक नियंत्रण करण्यास सांगितलं. मात्र एका पोलिसाने नकार दिल्यामुळे आमदार महोदयांनी भररस्त्यात ठिय्या आंदोलन सुरु केलं. यामुळे वाहतूक खोळंबा वाढून पोलिसांची तारांबळ उडाली.

'आम्ही इकडून येत होतो, अधिवेशनाला चाललो होतो. या पोलिसाला सांगितलं गाड्या वगैरे अंगावर येत आहेत, जरा लक्ष दे, तर रमेश चौधरी नावाचा पोलिस झाडाखाली आमची ड्युटी आहे, असं सांगत उलट बोलायला लागला' असा दावा कदम यांनी केला.

अखेर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलिसांचा मोठा फौज फाटा आल्यानंतर आमदारांची समजूत काढण्यात यश आलं. मात्र वाहतूक खोळंबा सोडवण्यासाठी आंदोलनाला बसलेल्या आमदारांमुळे तब्बल अर्धा तास ट्राफिक जॅम झाला.