मुंबई/नाशिक : शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. योगेश घोलप (Yogesh Gholap) उद्धव ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांचे पुत्र आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन बबनराव घोलप नाराज आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन बबनराव घोलप नाराज असतानाच योगेश घोलप यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. योगेश घोलप हे देवळाली मतदारसंघातून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार सरोज आहिरे या अजित पवार गटात गेल्याने शरद पवार गटात नाराजी नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर योगेश घोलप यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने त्याला महत्त्व आलं आहे.


'ही सदिच्छा भेट'


देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार योगेश घोलप यांनी आज मुंबई इथे शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे योगेश घोलप हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.मात्र ही केवळ सदिच्छा भेट होती अशी माहिती योगेश घोलप यांनी दिली.  शरद पवार हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते असून ठाकरे गट महाविकास आघाडी गटाचा एक घटक आहेत. त्यामुळे आपण त्यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले, असं योगेश घोलप यांनी सांगितलं. मात्र असं असलं तरी नाशिकमध्ये ठाकरे गटामध्ये खळबळ उडाली आहे. 


दरम्यान सरोज अहिरे यांना शह देण्यासाठी योगेश घोलप राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसंच नाराज घोलप यांना शरद पवार हे सरोज अहिरे यांना शह देण्यासाठी जवळ करणार का असा देखील एक प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात पुढे काय घडले हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.


बबनराव घोलप नाराज, पण...


काही दिवसांपूर्वी माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देत नाराजीचा बॉम्ब फोडला होता. घोलप यांचा राजीनामा ठाकरे गटाच्या पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला नसला तरी घोलाप यांनी वेट अँड वॉच ठेवले आहे. तसेच त्यांना चर्चेसाठी मातोश्रीवरून अद्यापही निरोप अथवा फोन आला नसल्यामुळे घोलप यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, बबनराव घोलप हे ठाकरे गटातच राहणार असल्याचे सांगितलं जात आहे.


हेही वाचा


Shirdi Loksabha : शिवसेना भवनमध्ये बैठक पण शिर्डीचा तिढा कायम; बबनराव घोलप यांच्या कार्यकर्त्यांचा वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध