मुंबई : रक्षाबंधन, गणेशोत्सव या कालावधीमध्ये भारतीय रेल्वेकडून नियमित फेऱ्यांशिवाय विशेष ट्रेन चालवल्या जातात. रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या विशेष ट्रेनला प्रवासी देखील चांगला प्रतिसाद देतात. मात्र, अनेकदा विशेष ट्रेन उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. मध्य रेल्वेकडून मुंबई नागपूर विशेष ट्रेन ही गाडी जाहीर करण्यात आली होती. मात्र, रात्री 12.20 वाजता सुटणारी गाडी सकाळी 6 वाजले तरी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये न आल्यानं प्रवासी प्रंचड संतापल्याचं दिसून आलं. मध्य रेल्वेचं या घटनेसंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही.
मुंबई नागपूर विशेष ट्रेन सहा तास उलटून ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये आलीच नाही. यामुळं या ट्रेनसाठी ज्यांनी बुकिंग केलं होतं ते प्रवासी प्रचंड संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. प्रवाशानी रेल्वे स्थानक परिसरात आक्रमक भूमिका घेतली. मध्य रात्री 12.20 वाजता सुटणारी विशेष ट्रेन सहा तास उलटले तरी आली नाही. रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून चालकाशी संपर्कच होत नसल्याचे कारण दिलं जात आहे, अशी माहिती आहे. दरम्यान, 6.45 च्या दरम्यान मुंबई-नागपूर विशेष ट्रेन स्टेशनमध्ये दाखल झाली, अशी माहिती आहे.
अधिकाऱ्यांना ही घातला प्रवाशांचा घेराव
मध्यरात्री 12 वाजल्यानंतर सुटणारी मुंबई नागपूर विशेष ट्रेन सहा तास उलटल्यानंतर देखील न आल्यानं संतापलेल्या प्रवाशांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आक्रमक भूमिका घेतली. यावेळी प्रवाशी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेराव देखील घातला. मुंबई नागपूर विशेष ट्रेनच्या प्रवाशांनी सहा वाजता निघणारी गीतांजली एक्सप्रेस जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. संतापलेल्या प्रवाशांनी रेल रोको करण्याचा निर्णय घेतल्याचं देखील दिसून आलं. काही प्रवासी रेल्वे ट्रॅकवर जाऊन उभे राहिले होते. गीतांजली एक्स्प्रेस ही दररोज सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईहून नागपूरला जाते. विशेष ट्रेनचे प्रवासी ही ट्रेन सुटण्यापूर्वी आक्रमक झाले होते.
सात तासानंतर देखील मुंबई -नागपूर विशेष ट्रेन न सुटल्यानं प्रवाशांनी सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला आहे. विक्रांत जटाले नावाच्या एक्स अकाऊंटवरुन मुंबई नागपूर ट्रेन 7 तासांचा उशीर झाला तरी टर्मिनसमध्ये न आल्याचं म्हटलंय. ट्रेन जिथून सुटते तिथं ट्रेन पोहोचलेली नाही. कुटुंब खोळंबलेली असल्याचं देखील त्यानं म्हटलंय.ट्रेन उशिरानं आल्यानं रक्षाबंधनाचे नियोजन उध्वस्त झाल्याचं त्या प्रवाशानं म्हटलंय. भारतीय रेल्वेवर टीका देखील त्यानं केलीय.