मुंबई : मुंबईतील मोने रेल तांत्रिक बिघाडामुळं भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनी दरम्यान मध्येच अडकली होती. दीड तासांपासून अधिक वेळ मोनो रेलमध्ये प्रवासी अडकून पडले होते. मोनो रेलमध्ये 200 प्रवासी प्रवास करत होते. मोनो रेलमधील प्रवाशांनी अखेर एक काच फोडल्याचं पाहायला मिळालं. मोनो रेल एका बाजूला थोडी कललेली आहे. जवळपास 200 लोक आहेत, अशी माहिती आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाची यंत्रणा तिथं पोहोचली आहे, मुंबई पोलीस पोहोचले आहेत. कोणतंही संकट टाळण्यासाठी वीजेचा पुरवठा थांबवला आहे. आपत्कालीन खिडक्या उघडल्यानं बाहेरची हवा आत पोहोचली आहे, अशी माहिती  मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. अग्निशमन दलाचे प्रमुख परब आणि अतिरिक्त आयुक्त तिथं पोहोचले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.  

मोनो रेल अचानक त्या ठिकाणी बंद पडल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान परब यांच्या नेतृत्त्वात तिथं पोहोचले. मोनो रेलचा वीजेचा पुरवठा बंद करणं गरजेचं होतं, त्यामुळं दोन तास लागले. वीज पुरवठा बंद केल्यानंतर लोकांची सुटका करण्यात आली आहे. काही प्रवाशांना वैद्यकीय मदत गरजेची आवश्यकता असल्यास त्यांना वैद्यकीय सुविधा देण्यात येईल. काही तांत्रिक कारणांमुळं मोनो रेल बंद पडली असावी, असा आमचा अंदाज आहे, असं भूषण गगराणी म्हणाले. अर्ध्या तासात सर्व प्रवासी खाली येतील, अशी माहिती देखील भूषण गगराणी यांनी दिली आहे. 

चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेल्या मोनो रेल्वेतून प्रवाश्यांना बाहेर काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे  मुंबई अग्निशमन दलाकडून  मदत कार्य सुरुवात करण्यात आली होती. दीड तासानंतर मोनो रेलमधून प्रवाशांची सुटका करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. घटनास्थळी  महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयास सुसज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोनो रेल्वेच्या एका डब्याची काच फोडून रेस्कू ऑपरेशन राबवण्यात आलं आहे. मोनो रेलमधून एक एक करत मोनो रेलमधून प्रवाशांना खाली उतरवण्यात येत आहे.

लोकल बंद होती, बेस्टच्या बसेस बंद होत्या, त्यामुळं मोनोनं आलो आणि दोन तास अडकून बसलो, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशानं दिली. प्रशासनं आलं पण पाऊस चालू असल्यानं काय करणार, त्यांचा देखील दोष नाही, असं एका प्रवाशानं म्हटलं. मोनोमधील प्रवाशांच्या चेहऱ्यावर भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.