मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात आज मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीमध्ये सरकारने वीजबिल प्रकरणी लवकरच ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु, अद्याप याबाबत काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे ग्राहकांचा विश्वासघात केला आहे. अशा प्रकारची नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून याआधी अनेकवेळा सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट देखील घेण्यात आली होती. त्यावेळी लवकरात लवकर निर्णय घेऊ अशा प्रकारचा आश्वासन देखील देण्यात आले होतं. परंतु, कुठल्याही प्रकारचा आश्‍वासन पूर्ण न झाल्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नितीन राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.


याबाबत बोलताना मनसे माहीम विधानसभेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार म्हणाले की आम्ही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह बेस्ट कंपनीचे प्रमुख अधिकारी यांच्या विरोधात देखील तक्रार दाखल केली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी राज्यभरातून विविध पोलिस ठाण्यात दाखल होणार आहेत. 1 ऑगस्ट 2020 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने वाढीव वीज बिलाबाबत नितीन राऊत यांची भेट घेतली होती. त्यावेळी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून वीज बिलामध्ये सवलत देण्यासाठी अनुदानाची मागणी करणार आणि वाढीव बिलामध्ये सूट दिली जाणार असं आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिलं होतं. त्यानंतर 19 ऑगस्ट 2020 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेऊन आवाजवी वीज बिलांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. 26 सप्टेंबर 2020 ला मनसेच्या शिष्टमंडळाने ऊर्जा सचिव असीम गुप्ता यांची भेट घेतली होती.


ऊर्जामंत्री आणि बेस्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार
बैठकीमध्ये त्यांना महाराष्ट्र वीज नियामक मंडळाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडून 9 मे 2020 रोजी सर्व वीज कंपन्यांना प्रॅक्टिस डायरेक्शनद्वारे ग्राहकांना कोव्हिडं-19 लॉकडाऊन कालावधीमधील वीज देयकाबाबत केलेले स्पष्टीकरण निदर्शनास आणून दिलं होतं. परंतु, त्यावेळी ऊर्जामंत्री कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यामुळे ज्यावेळी ऊर्जामंत्री कार्यालयात रुजू होतील. त्यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे शिष्टमंडळ आणि सर्व वीज कंपनीचे प्रमुख यांची याविषयी संयुक्त बैठक घेऊ असं आश्वासन असीम गुप्ता यांनी दिलं होतं. परंतु, तसं काहीच घडलं नाही. त्यानंतर ऊर्जामंत्री यांनी राज्यातील जनतेला प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून वीज बिलामध्ये सवलत देऊन दिवाळीची गोड भेट देऊ असे संकेत दिले होते. परंतु, हेदेखील घडलं नाही. त्यामुळे वरील घटनाक्रम पाहता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे. असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे लवकरात लवकर उर्जामंत्री आणि बेस्ट कंपनीचे प्रमुख अधिकारी यांच्या विरोधात फसवणूक आणि मानसिक आघात पोहचवणे अशा प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी विनंती आम्ही पोलिसांना केली आहे. अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी आज राज्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल होतील, असंही सांगण्यात आलं आहे.