मुंबई : वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या लेकाला अद्दल घडवण्यासाठी मुंबईतील एका आमदाराने अनोखी शक्कल लढवली. चौकामध्ये वडिलांसह मुलाचा फोटो लावून 'जन्मदात्याला घराबाहेर काढणाऱ्या मुलाचा धिक्कार असो' अशा शब्दात आमदार भारती लव्हेकर यांनी निषेध व्यक्त केला आहे.

भारती लव्हेकर या मुंबईतील वर्सोवा भागातून भाजपच्या आमदार आहेत.

अंधेरीत राहणाऱ्या विकास वाघमारे या 45 वर्षीय व्यक्तीने आठ वर्षांपूर्वी आपल्या वडिलांना घराबाहेर काढलं होतं. त्यामुळे 72 वर्षांचे शंकर वाघमारे सध्या वर्सोव्यातील एका छोट्याशा मंदिरात राहतात. 'मुंबई मिरर' वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी शंकर वाघमारेंनी लव्हेकरांना आपली हकिगत सांगितली. आपल्या मुलाचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असून त्याने तिला घरात आसरा दिला आहे. आपण दोघांच्या संबंधांना विरोध करु आणि चारचौघात त्याबाबत गवगवा करु, या भीतीने दोघांनी मला घराबाहेर काढलं, असा दावा वाघमारेंनी केला.

शंकर वाघमारेंनी काढलेली चित्रही मुलाने परस्पर विकून टाकली किंवा फेकून दिली. त्यामुळे रोज पोट भरण्यासाठी शंकर यांना काहीतरी काम शोधावं लागतं. आमदार भारती लव्हेकरांनी वाघमारेंना पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र दरम्यानच्या काळात मुलाच्या मनात शरम निर्माण करण्यासाठी लव्हेकरांनी हे पोस्टर लावलं.

अंधेरीतील गजबजलेल्या लोखंडवाला सर्कलमध्ये हे पोस्टर लावण्यात आलं आहे. वडिलांची माफी माग आणि त्यांना सन्मानाने घरी परत घेऊन ये, असा इशारा या पोस्टरवरुन देण्यात आला आहे. सध्या एकच पोस्टर लावलं असून येत्या काळात विकास राहत असलेल्या सात बंगला परिसरातील चाळीबाहेर आणखी चार पोस्टर्स लावण्याचा मानस लव्हेकरांनी बोलून दाखवला.

काय आहे पोस्टर?

जन्मदात्या पित्याला घराबाहेर हाकलून देणाऱ्या मुलाचा धिक्कार असो. अजूनही वेळ गेलेली नाही!! जन्मदात्या पित्याची माफी माग आणि सन्मानाने घरी घेऊन जा. पित्याची सेवा कर

मुलाने आरोप फेटाळले

मुलगा विकास वाघमारेंनी मात्र आपल्या वडिलांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपले वडील ड्रग्जच्या आहारी गेले असून आई हयात असताना ते तिला सतत मारहाण करायचे, असा दावा मुलाने केला आहे. 'वडिलांनी आपणहून घर सोडलं होतं, त्यानंतर ते मढमध्ये राहणाऱ्या माझ्या बहिणीकडे राहायला गेले. तिलाही वडिलांच्या व्यसनाबद्दल समजलं, तेव्हा तिने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.' असं विकास वाघमारे सांगतात.

'आपण ज्या महिलेला बहिणीप्रमाणे मानतो, तिच्याशी आपले अनैतिक संबंध असल्याचं सांगून वडील आपली प्रतिमा मलिन करत आहेत. वडिलांनी मला वयाच्या 13 व्या वर्षी वाऱ्यावर सोडलं. माझी आई गेली, तेव्हा याच महिलेने सांभाळलं. मी कठीण परिस्थितीला तोंड देत स्वतःचा मार्ग शोधला' असं विकास वाघमारे यांनी सांगितलं.

शंकर वाघमारेंच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिसांनी विकास यांना समन्स बजावलं. त्यामुळे मुलाने वडिलांना पुन्हा आपल्या घरी नेण्याची तयारी दर्शवली आहे.