मुंबई : क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणात मुलुंडमध्ये एका 17 वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला आहे. अल्लाउद्दीन असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. अल्लाउद्दीनच परिसरात राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाने केलेल्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला.
अल्लाउद्दीन हा भांडुपच्या डी ए व्ही महाविद्यालयात अकरावीत शिकत होता. परीक्षा असल्याने तो घरात बसून अभ्यास करत होता. यावेळी शेजारील एक अल्पवयीन मुलगा दुसऱ्या एका मुलाबरोबर क्रिकेट खेळत होता. पण गोंगाट आणि बॉल घराच्या पत्र्याला लागल्याने अभ्यासात अडथळा आल्यामुळे अल्लाउद्दीनने, त्यांना खेळ बंद करण्यास सांगितला.
यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली आणि मग त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. मुलाने अल्लाउद्दीनच्या पोटात हाताने ठोसे मारले. यादरम्यान अल्लाउद्दीन जवळच्या लोखंडी खांबालाही धडकला. मारहाणीमुळे तो जागीच बेशुद्ध झाला आणि मारहाण करणाऱ्या मुलाने तिथून पळ काढला.
अल्लाउद्दीनला इतर नागरिक आणि त्याच्या मित्रांनी आधी एका खाजगी रुग्णलयात नेलं, परंतु त्यांना तिथून सरकारी महापालिकेच्या एम टी अग्रवाल रुग्णालयात उपचारांसाठी पाठवलं. यादरम्यान अल्लाद्दीनला रक्ताच्या उलट्याही केल्या. अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.
अल्लाउद्दीनचे वडील रफिक यांनी मारहाण करणाऱ्या 17 वर्षीय मुलाविरोधात मुलुंड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून त्याला अटक केली आहे. त्याती रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.