मुंबई: सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मागील काही वर्षांत म्हाडाच्या घरांच्या किंमतींमध्ये (MHADA Housing Lottery)  झालेल्या प्रचंड वाढीमुळे सर्वसामान्यांना ही घरे परवडेनाशी झाली होती. गरजूंपैकी अनेकांनी म्हाडाच्या सोडतीकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता परिस्थितीत बदल होणार असून म्हाडाच्या (MHADA Housing Lottery)  नव्या आणि सुरू असलेल्या प्रकल्पातील घरे किमान १० टक्क्यांनी स्वस्त होणार आहेत. कारण घरांच्या किंमती निश्चित करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने अखेर नवीन धोरण तयार केलं आहे. आठवडाभरात हे धोरण उपाध्यक्षांकडे सादर होणार असून त्यानंतर त्यास मंजुरी मिळाल्यावर अंमलबजावणी होईल.(MHADA Housing Lottery)

Continues below advertisement

MHADA Housing Lottery: ताडदेव येथील साडेसात कोटी किंमतीची सात घरे दोन सोडतीनंतरही रिक्त पडून

मुंबईसह राज्यातील म्हाडाच्या घरांना प्रचंड मागणी असली तरी वाढत्या किंमतींमुळे अनेक विजेते घर परवडत नसल्याने ती परत करत होते. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी असलेली घरे देखील महाग झाल्याने गरजू अर्जदार अर्ज टाळत होते. तर उच्च गटातील कोट्यवधींची घरे विक्रीअभावी पडून राहिल्याचे चित्र आहे. ताडदेव येथील साडेसात कोटी किंमतीची सात घरे दोन सोडतीनंतरही रिक्त पडून आहेत. यामुळे म्हाडाच्या किंमत धोरणावर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी काही महिन्यांपूर्वी एक समिती स्थापन करून सर्वसामान्यांच्या आवाक्यातील किंमती कशा ठरवता येतील याचा अभ्यास करण्याची जबाबदारी दिली होती.

MHADA Housing Lottery: नवीन व सुरू प्रकल्पातील घरांच्या किंमती निश्चित होताना १० टक्क्यांनी कपात

समितीने दीर्घ अभ्यासानंतर दोन सूत्रांवर आधारित धोरण अंतिम केलं आहे. आतापर्यंत किंमतीत ५ टक्के प्रशासकीय खर्चासह काही अतिरिक्त खर्च निश्चित टक्केवारीने जोडला जात होता, ज्यामुळे किंमती अनावश्यकरीत्या वाढत होत्या. आता मात्र प्रत्यक्षात झालेला खर्चच किंमतीत समाविष्ट केला जाईल. तसेच बांधकाम खर्च जितका आहे तितकाच समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे. या पद्धतीमुळे नवीन व सुरू प्रकल्पातील घरांच्या किंमती निश्चित होताना १० टक्क्यांनी कपात होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Continues below advertisement

दरम्यान, वस्तू व सेवा कररचनेतील बदलांमुळे बांधकाम साहित्याच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. सिमेंट, स्टीलसह इतर साहित्य स्वस्त झाल्याने याचा थेट परिणाम म्हाडाच्या घरांच्या अंतिम किंमतीवर होईल. त्यामुळे पुढील सोडतींमध्ये घरे तुलनेने स्वस्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.